देवरूखमध्ये सहसंवेदना कार्यशाळा उत्साहात संपन्न: ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ स्वागत थोरात यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

देवरूखमध्ये सहसंवेदना कार्यशाळा उत्साहात संपन्न: 'ब्रेल मॅन ऑफ इंडिया' स्वागत थोरात यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त उपक्रम; १६८ विद्यार्थी, प्राध्यापक व दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सहभाग

देवरूख :
सृजन सायन्स सेंटर देवरूख येथे देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे कोकण विभागीय ‘सहसंवेदना कार्यशाळा’ बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध दिग्दर्शक व सामाजिक कार्यकर्ते स्वागत थोरात यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत एकूण १६८ विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशिक्षकांनी सहभाग नोंदवून संवेदनशीलतेचा वस्तुपाठ घेतला.

या कार्यशाळेत न्यू इंग्लिश स्कूल, ए. ए. पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच ‘दिव्यांग साहस प्रकल्प देवरूख’, चिपळूण येथील ‘नॅब’ संस्था आणि कोकणात दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेले कार्यकर्ते व प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेळांच्या माध्यमातून दिव्यांगांचे विश्व आणि आव्हानांची जाणीव
मार्गदर्शन करताना स्वागत थोरात यांनी विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे विविध २१ प्रकार आणि त्यामुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणारी आव्हाने यांची सविस्तर जाणीव करून दिली. सर्व ज्ञानेंद्रियांचा सक्षमतेने वापर करून आत्मविश्वासाने कसे जगावे, सांघिक भावना कशी जोपासावी आणि नकारात्मकता दूर करून सकारात्मक कसे व्हावे, याचे मार्गदर्शन त्यांनी केले. थोरात यांच्या सहकारी स्वरूपा गोखले-देशपांडे यांनी विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या सर्व बाबींचा प्रत्यक्ष अनुभव आणि वस्तुपाठ दिला.

Dr radhika

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी, "ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये सजगता व संवेदनशीलता निर्माण करेल, ज्यामुळे मुले समाजाला उपकारक ठरणारे कार्य करतील," असा विश्वास व्यक्त केला.

अंध कलाकारांच्या रंगभूमीवरील प्रयोगांची पार्श्वभूमी
जागतिक रंगभूमीच्या इतिहासात अंध विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक उत्कृष्ट नाटके बसवण्याचे ऐतिहासिक आणि आव्हानात्मक कार्य स्वागत थोरात यांनी केले आहे. ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘अपूर्व मेघदूत’, ‘संगीत स्वयंवर’, महात्मा फुले यांचे ‘तृतीय रत्न’ आणि तमिळ लेखिका सलमा यांच्या सोनाली नवांगुळ यांनी अनुवादित केलेल्या ‘मध्यरात्री नंतरचे तास’ या पुस्तकावर आधारित नाटकांची संकल्पना आणि दिग्दर्शन स्वतः थोरात यांनी केले आहे. या प्रयोगांद्वारे त्यांनी शेकडो अंध कलाकारांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे.

प्रशासकीय व शैक्षणिक संस्थांचे मोलाचे सहकार्य
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडुलकर व उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी मोलाचे सहकार्य व शुभेच्छा दिल्या. मराठी विभागाच्या डॉ. वर्षा फाटक व प्रा. अजित जाधव यांनी या कार्यशाळेचे नेटके संयोजन केले.

तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. डॉ. सुनील सोनवणे, डॉ. प्रशांत नरगुडे, अनिकेत ढावरे, डॉ. मयुरेश राणे, ग्रंथपाल डॉ. सुभाष माइंगडे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक कोकणी सर, आणि अरुंधती पाध्ये इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका सोनाली नारकर यांचे सहकार्य लाभले. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह शिरीष फाटक व सृजन सायन्स सेंटरचे चेअरमन डॉ. केदारी यांनी सेंटरमधील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.