चालक किरकोळ जखमी; राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू, जीवितहानी नाही
राजापूर :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असताना, राजापूर तालुक्यातील कोदवली येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक मालवाहू कंटेनर उलटून अपघात घडला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू कंटेनर (क्र. MH 04 JK 7039) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. कोदवलीनजीकच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्यावरील दुभाजकाला (डिव्हायडर) जोरदार आदळला आणि महामार्गावरच उलटला.
राजापूर पोलिसांची तातडीने घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रस्ता मोकळा करून वाहतूक पूर्ववत केली.

अपघातात दुखापत झालेल्या कंटेनर चालकाला पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चालकावर प्राथमिक उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या अपघाताची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.













