Rajapur Municipality Diwali Bonus: राजापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत १५ हजार रुपये बोनस; बैठकीत महत्त्वाच्या ठरावांना मंजुरी

Rajapur Municipality Diwali Bonus: राजापूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत १५ हजार रुपये बोनस; बैठकीत महत्त्वाच्या ठरावांना मंजुरी

नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक; वाहने खरेदी, कुत्र्यांचे शेल्टर हाऊस आणि कोदवली धरण बंदीचा ठराव संमत

राजापूर :
राजापूर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आनंदाची ठरणार आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आगामी दिवाळी सणासाठी १५ हजार रुपये बोनस देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव नगरपालिकेच्या विशेष बैठकीत एकमुखाने संमत करण्यात आला. नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली, ज्यामध्ये राजापूर शहराच्या विकासाशी आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत शहराच्या दैनंदिन कामांसाठी अत्यंत आवश्यक असणारे ट्रॅक्टर आणि डंपर यांसारखी नवीन वाहने खरेदी करण्याचा ठराव संमत करण्यात आला. हा मुद्दा नगरसेवक जमीर खलिफे यांनी सभागृहात मांडला होता. याशिवाय, शहरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्यांच्या निर्बीजीकरणासाठी स्वतंत्र शेल्टर हाऊस उभारण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली असता, त्यावरही सकारात्मक चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आला.

कोदवली धरण परिसर पर्यटकांसाठी प्रतिबंधित करण्याचा निर्णय
राजापूर शहरातील कोदवली धरण परिसरात अनेक नागरिक आणि पर्यटक पोहण्यासाठी जातात. मात्र, तेथे पाण्याचा अंदाज न आल्याने कोणताही अनुचित किंवा जीवघेणा अपघात घडू शकतो, ही बाब गांभीर्याने घेत धरण परिसर नागरिकांसाठी पूर्णपणे प्रतिबंधित करण्याचा ठराव सभेने संमत केला. याबाबतचा आवश्यक पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच केला जाणार आहे.

Mahrashi karve ANM

धरण परिसरात यापुढे कोणीही नागरिक विनापरवाना गेल्यास आणि तेथे दुर्घटना घडल्यास त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, अशी महत्त्वपूर्ण सूचना नगरसेवक जमीर खलिफे यांनी सभागृहात मांडली. नगरसेवक राहुल तांबे यांनीही कोदवली धरण परिसर तातडीने प्रतिबंधित क्षेत्रा घोषित करण्याची आग्रही मागणी केली होती.

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नवीन बंधारे उभारणार
या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे आगामी काळात राजापूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ही संभाव्य टंचाई रोखण्यासाठी पूर्वउपाययोजना म्हणून शहरातील शीळ जॅकवेल आणि आंबेवाडी जॅकवेलनजीक कच्चे/पक्के बंधारे बांधण्यात यावेत, असा अत्यंत महत्त्वाचा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला.

नागरी समस्यांवर नगरसेवकांची आक्रमक भूमिका
सभेत शहरातील विविध प्रलंबित समस्यांवर नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले:

रस्त्यांची दुरुस्ती: नगरसेवक दिलीप चव्हाण यांनी तालीमाखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्यावरील खड्डे तातडीने भरून रस्ता प्रवाशांसाठी सुरक्षित करण्याची मागणी केली.

बंद सोलार दिवे: शहरातील विविध प्रभागांमधील बंद पडलेले सोलार हायमास्ट दिवे तातडीने दुरुस्त करून पूर्ववत सुरू करण्याची मागणी नगरसेवक दिलीप अमरे यांनी केली.

या बैठकीस पालिकेचे सर्व नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.