अरिजितच्या संघर्षावर अभिजीतची प्रतिक्रिया..
मुंबई:
सन २००५ मध्ये एकाच रिअॅलिटी शोच्या माध्यमातून संगीताच्या दुनियेत पाऊल ठेवणारे दोन गायक म्हणजे मराठमोळा कलाकार अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) आणि बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंह (Arijit Singh). ‘इंडियन आयडॉल’चा (Indian Idol) पहिला सीझन जिंकून अभिजीत सावंत रातोरात देशभरात प्रसिद्ध झाला होता, तर दुसरीकडे अरिजित सिंहने प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून संगीत क्षेत्रात प्रचंड मेहनत घेतली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिजीत सावंतने या दोन्ही प्रवासांवर भाष्य करत, "एक काळ असा होता जेव्हा मी अरिजितपेक्षा जास्त पॉप्युलर होतो," असे विधान केले आहे.
‘फिल्मीज्ञान’ (Filmygyan) ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना अभिजीतने सांगितले की, २००५ नंतर अरिजित सुमारे १० वर्षे प्रसिद्धीपासून दूर राहिला. या काळात त्याने पडद्यामागे राहून दिग्गज संगीतकारांसोबत म्युझिक प्रोड्युसर आणि प्रोग्रामर म्हणून काम केले. तर दुसऱ्या बाजूला अभिजीतने ‘इंडियन आयडॉल’ जिंकून १ कोटी रुपयांचे बक्षीस आणि ‘सोनी’सोबत अल्बमचे कॉन्ट्रॅक्ट मिळवत घराघरांत ओळख निर्माण केली होती.
"मी त्याच्यापेक्षा जास्त पॉप्युलर होतो, पण त्याचा संघर्ष वेगळा होता"
अरिजित सिंहच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाबद्दल सांगताना अभिजीत सावंत म्हणाला, "२००५ नंतर अरिजित लाइमलाइटपासून दूर राहिला. त्यानंतर १० वर्षे त्याने म्युझिक स्टुडिओमध्ये मोठ्या संगीतकारांसोबत काम केले. एक सिंगर म्हणून नाही, तर प्रोग्रामर आणि प्रोड्युसर म्हणून त्याने काम केले. त्याने पुन्हा शून्यापासून प्रवासाला सुरुवात केली आणि कोणालाच याबद्दल माहिती नव्हती."

अभिजीतने पुढे दोन्ही गायकांच्या लोकप्रियतेची तुलना करताना सांगितले, "जर तुम्ही माझी आणि अरिजितची तुलना केली, तर मी त्या काळात त्याच्यापेक्षा जास्त पॉप्युलर होतो. त्यामुळे मी अनुभवलेले प्रेशर हे पूर्णपणे वेगळे होते आणि त्याच्या वाट्याला आलेले प्रेशर वेगळे होते. त्या १० वर्षांत त्याने अफाट काम केले आणि त्यानंतर त्याला त्याचे पहिले मोठे गाणे मिळाले."
‘तुम ही हो’ गाण्याने बदलली अरिजितची कारकीर्द
अभिजीतच्या मते, तो लोकांच्या अपेक्षा आणि प्रसिद्धीच्या मागण्यांशी जुळवून घेण्यात व्यस्त असताना, अरिजित मात्र शांतपणे आपल्या संगीतावर लक्ष केंद्रित करत होता. जरी अरिजितने यापूर्वी ‘मर्डर २’ (Murder 2) चित्रपटातील ‘फिर मोहब्बत (दिल संभाल जा जरा)’ हे गाणे गायले असले, तरी २०१३ मधील ‘आशिकी २’ (Aashiqui 2) चित्रपटातील ‘तुम ही हो’ हे गाणे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरले.
"तुम ही हो या गाण्यामुळे अरिजितला खरी प्रसिद्धी मिळाली आणि या गाण्याने त्याला ‘अरिजीत सिंह’ बनवले," असे अभिजीतने नमूद केले. शेवटी बोलताना तो म्हणाला, "जे आधीच यशस्वी आहेत, त्यांनाच प्रेक्षक डोक्यावर घेतात. पण ज्यांच्याबद्दल माहीत नसते, त्यांच्यात आपण दोष शोधत राहतो. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येक जण आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असतो."













