३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत क्लिनिक आणि रुग्णालयांमध्ये क्यूआर कोड प्लेट लावणे बंधनकारक; बोगस डॉक्टरांना बसणार चाप
अमरावती:
वैद्यकीय क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासोबतच बोगस डॉक्टरांच्या भुलथापांना आणि बेकायदेशीर प्रॅक्टिसला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (MMC) एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व नोंदणीकृत डॉक्टरांसाठी ‘नो युअर डॉक्टर’ (KYD) क्यूआर कोड प्लेट आपल्या क्लिनिक किंवा रुग्णालयात लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
एमएमसीच्या अधिकृत प्रणालीतून (Portal) प्राप्त झालेली मूळ व डिजिटल स्वाक्षरीयुक्त (Digitally Signed) प्लेटच ग्राह्य धरली जाणार आहे. कोणत्याही प्रकारचा स्क्रीनशॉट किंवा साधा प्रिंटआउट ग्राह्य धरला जाणार नाही, असे कौन्सिलने स्पष्ट केले आहे.
एकाच स्कॅनवर मिळणार डॉक्टरांची सर्व माहिती
रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी क्लिनिकमधील दर्शनी भागात लावलेली ही ‘केवायडी’ (KYD) प्लेट आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन केल्यावर संबंधित डॉक्टरांची संपूर्ण अधिकृत माहिती स्क्रीनवर उपलब्ध होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने:

डॉक्टरांचे पूर्ण नाव
शैक्षणिक पात्रता (Medical Degree)
एमएमसी (MMC) नोंदणी क्रमांक
नोंदणीचा कालावधी (Validity)
प्रॅक्टिसशी संबंधित अधिकृत तपशील
यामुळे रुग्णांना आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर वैध आहेत की नाही, हे एका क्लिकवर सहजरीत्या तपासता येणार आहे.
मुदतीत प्लेट न लावल्यास १५ हजारांचा दंड अन् शिस्तभंगाची कारवाई
निर्धारित मुदतीत म्हणजेच ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ही प्लेट न लावणाऱ्या डॉक्टरांवर एमएमसीकडून दंडात्मक तसेच शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाऊ शकते. पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर, एमएमसीकडे नोंदणीकृत असलेले वैध डॉक्टरच ही प्रणाली वापरू शकणार असल्याने राज्यातील बोगस आणि अपात्र डॉक्टरांच्या धंद्याला पूर्णपणे चाप बसणार आहे.













