Khed News: खेड तालुक्यात २८ सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’; ११ महसूल मंडळांमध्ये एकाच वेळी विशेष शिबिरे

Khed News: खेड तालुक्यात २८ सप्टेंबरला 'सेवा संकल्प अभियान'; ११ महसूल मंडळांमध्ये एकाच वेळी विशेष शिबिरे

विमुक्त व भटक्या जमाती प्रवर्गासाठी प्रशासनाचा पुढाकार; जात प्रमाणपत्र, आधार आणि रेशन कार्ड एकाच छताखाली मिळणार

खेड :
विमुक्त व भटक्या जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांना तसेच सर्वसामान्य घटकांना विविध शासकीय सेवा सहज आणि एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खेड तालुक्यात सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विशेष शिबिरांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व ११ महसूल मंडळांमध्ये सकाळी ११ वाजता एकाच वेळी ही शिबिरे सुरू होतील, अशी अधिकृत माहिती उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) वैशाली पाटील यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांविधानिक पदावरील २५ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जात आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या सूचनेनुसार खेड उपविभागीय आणि तहसील प्रशासनाने या विशेष शिबिरांची रूपरेषा तयार केली आहे.

एकाच ठिकाणी मिळणारे महत्त्वाचे दाखले आणि सेवा
ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, यासाठी या शिबिरांमध्ये खालील प्रमुख सेवा पुरवण्यात येणार आहेत:

Shanti real estate 1

विद्यार्थी व शैक्षणिक दाखले: शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विविध दाखले, जात प्रमाणपत्र (Cast Certificate) आणि नॉन-क्रिमिलेअर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र.

नागरिकत्व व महसूल सेवा: नवीन ओळखपत्र नोंदणी/दुरुस्ती, नवीन शिधापत्रिका (Ration Card) व रेशन कार्डातील नाव दुरुस्ती किंवा बदल.

जमीन महसूल: डिजिटल सातबारा (7/12 Extracts) आणि इतर महसूलविषयक महत्त्वाच्या सेवा.

प्रशासनाचे ई-सेवा केंद्र चालकांना कडक निर्देश
या शिबिरांचे काम विनाअडथळा आणि गतीने पार पडावे यासाठी तालुक्यातील सर्व नियुक्त महा ई-सेवा केंद्र चालक तसेच ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालकांनी आवश्यक ते सर्व संगणकीय साहित्य आणि इंटरनेट सुविधेसह निर्धारित वेळेत उपस्थित राहण्याचे कडक निर्देश तहसीलदार सुधार सोनवणे यांनी दिले आहेत.

तालुक्यातील ११ महसूल मंडळांमधील गरजू नागरिक, विमुक्त व भटक्या जमाती प्रवर्गातील बांधव आणि विद्यार्थ्यांनी या विशेष शिबिरांचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन खेड तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.