Dapoli News: हर्णे बंदरात केरळ धर्तीवरील ‘खांद्याची’ मासेमारी यशस्वी; स्थानिक तरुणांना रोजगाराचा नवा पर्याय

Dapoli News: हर्णे बंदरात केरळ धर्तीवरील 'खांद्याची' मासेमारी यशस्वी; स्थानिक तरुणांना रोजगाराचा नवा पर्याय

कमी भांडवल, कमी खर्च आणि एकाच दिवसात ताजी मासळी बाजारात; हर्णे बंदरात सुमारे ६० छोट्या होड्यांमधून व्यवसाय सुरू

दापोली :
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध हर्णे बंदरात केरळच्या धर्तीवर सुरू झालेल्या ‌‘खांद्याच्या‌’ मासेमारी (Hook and Line Fishing) व्यवसायाला सध्या मोठी चालना मिळताना दिसत आहे. मोठ्या नौकांना समुद्रात अपेक्षित मासळी न मिळणे, इंधनाचे वाढते दर आणि खलाशांच्या मजुरीचा ताण या पार्श्वभूमीवर कमी भांडवलात आणि कमी खर्चात होणारा हा व्यवसाय स्थानिक मच्छीमारांसाठी एक उत्तम नवा पर्याय ठरत आहे.

या मासेमारी पद्धतीमध्ये छोट्या यांत्रिक होड्यांमधून समुद्रात जाऊन एकाच वेळी तब्बल ३०० ते ४०० गळ (Hooks) लावून सुरमई, घोळ आणि इतर मौल्यवान मासळीची शिकार केली जाते. सुरुवातीच्या काळात या विशिष्ट तंत्रासाठी केरळमधून खलाशी आणावे लागत होते. मात्र, गेल्या ५ वर्षांत स्थानिक कोकणी मच्छीमारांनी हे कौशल्य आत्मसात केले असून, आता अनेक स्थानिक तरुण स्वतःच्या होड्यांमधून हा व्यवसाय करत आहेत.

पारंपरिक मासेमारीसमोरील संकटावर ‘खांदा’ मासेमारी ठरतेय मात
सध्या समुद्रातील मासळीच्या उपलब्धतेतील अनिश्चितता, डिझेलचे वाढलेले दर, दलालांवरील अवलंबित्व आणि निर्यातीतील अडचणींमुळे मोठ्या मासेमारी नौकांचा खर्च भागवणे नौका मालकांसाठी कठीण झाले आहे. त्यातच हर्णे बंदरात जेटीची (Jetty) योग्य सुविधा नसल्याने मच्छीमारांचा वाहतूक खर्च आणखी वाढतो.

Naadi pariksha

याउलट, ‘खांद्याची’ मासेमारी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे:

कमी भांडवल व कमी इंधन: ही मासेमारी पेट्रोलवर चालणाऱ्या दोन ‘यामाहा’ (Yamaha) इंजिनयुक्त छोट्या होड्यांमधून केली जाते.

एकदिवसीय फेरी (One-Day Fishing): मच्छीमार एकाच दिवसात मासेमारी करून बंदरात परततात.

ताजी मासळी व चांगला भाव: एकाच दिवशी पकडून आणलेली मासळी अत्यंत ताजी असल्याने तिला बाजारात चांगला दर मिळतो.

बाहेरील खलाशांवरील अवलंबित्व संपले; हर्णे बंदरात ५५ ते ६० होड्या सज्ज
हर्णे बंदरात सध्या अशा प्रकारच्या सुमारे ५५ ते ६० छोट्या यांत्रिक होड्या कार्यरत आहेत. स्थानिक तरुणांनी या मासेमारी तंत्रात प्राविण्य मिळवल्याने परप्रांतीय किंवा केरळच्या खलाशांवरील अवलंबित्व पूर्णपणे संपुष्टात आले आहे. यामुळे स्थानिक पातळीवर तरुणांना रोजगाराची उत्तम संधी निर्माण झाली असून, अर्थकारणालाही नवी गती मिळत आहे.