Ratnagiri Divyang Airplane Tour: रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तीव्र दिव्यांगांनी केला मुंबई ते गोवा विनामूल्य विमान प्रवास

Ratnagiri Divyang Airplane Tour: रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तीव्र दिव्यांगांनी केला मुंबई ते गोवा विनामूल्य विमान प्रवास

शरीराच्या मर्यादांवर मात करत दिव्यांगांनी अनुभवला पहिला विमान प्रवास; ‘दिव्यांगमित्र’ अशोक भुस्कुटे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

रत्नागिरी :
"स्वतःच्या पायावर उभे राहता येत नाही, चालता येत नाही; मात्र आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न कुणीही हिरावून घेऊ शकत नाही." या ओळी सार्थ ठरवत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तीव्र दिव्यांगांनी शरीराला आलेल्या मर्यादांवर मात करत मुंबई ते गोवा असा विनामूल्य विमान प्रवास केला. प्रेरणादायी संदेश देणारी ही विशेष विमान प्रवास सहल अत्यंत उत्साहात आणि अविस्मरणीय आठवणींसह पार पडली.

रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून दरवर्षी प्रत्येकी एका दिव्यांगाची या विशेष विमान सहलीसाठी निवड केली जाते. पोलिओ, पॅराप्लेजिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी यांसारख्या तीव्र आजारांमुळे स्वतःच्या पायावर उभे राहणे किंवा चालणे अशक्य असलेल्या दिव्यांगांना या उपक्रमात प्राधान्य दिले जाते. विनामूल्य आयोजित केल्या जाणाऱ्या या सहलीमुळे जिल्ह्यातील अनेक दिव्यांगांचा आयुष्यातील पहिल्याच विमान प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे.

जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सहभागींची नावे
या वर्षीच्या विशेष विमान प्रवास सहलीत खालील दिव्यांगांनी सहभाग घेतला होता:

Arihant 3

सूरज सुरेश चव्हाण (राजापूर)

देवेश अजित कुळ्ये (लांजा)

मंदार रमेश आग्रे (संगमेश्वर)

सुगंधा अनंत कोदारे (संगमेश्वर)

रघुनाथ भगवान गोरे (खेड)

रिया संदीप मोरे (खेड)

द्रौपदी बाल्या चोगले (दापोली)

सूर्यकांत गोविंद चोगले (दापोली)

श्रावणी चंद्रशेखर शिंदे (चिपळूण)

या सर्वांसोबत मदतनीस म्हणून समीर करीम नाकाडे (रत्नागिरी), साक्षी संदीप मोरे (खेड) आणि या उपक्रमाचे मुख्य आयोजक ‘दिव्यांगमित्र’ अशोक विठ्ठल भुस्कुटे सहभागी झाले होते.

चिपळूण ते मुंबई आणि आकाशातील भावूक प्रवास
सोमवार, २१ सप्टेंबर रोजी सर्व दिव्यांग चिपळूण येथे अशोक भुस्कुटे यांच्या निवासस्थानी एकत्र आले. तेथून मध्यरात्री टेम्पो ट्रॅव्हलरने मुंबईकडे प्रयाण करण्यात आले. सांताक्रूझ येथे भुस्कुटे यांची कन्या आलिया हुजेर खान व जावई हुजेर रशीद खान यांनी सर्वांच्या भोजनाची उत्तम व्यवस्था केली.

दुपारी २ वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाल्यानंतर सायंकाळी ४:३० च्या सुमारास विमानाने गोव्याच्या दिशेने उड्डाण केले. पृथ्वीतलावर स्वतःच्या पायावर उभे राहता येत नसताना विमानातील खिडकीतून दिसणारे निळेशार आकाश, ढग आणि निसर्ग दृश्ये पाहताना सर्व दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आणि ओसंडून वाहणारा उत्साह दिसत होता.

गोव्यात जंगी स्वागत आणि जनशताब्दीने परतीचा प्रवास
सायंकाळी ५:३० वाजता विमान दाबोळी (गोवा) येथे पोहोचले. तेथे विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नऊ दिव्यांगांसाठी ९ व्हीलचेअर्स उपलब्ध करून दिल्या. त्यानंतर सर्वांची रवानगी जुना गोवा येथील ‘कलापूर रुग्णाश्रय आश्रमात’ करण्यात आली. आश्रमाच्या अध्यक्षा चित्रा नाईक यांनी सर्वांचे आस्थेने स्वागत करून भेटवस्तू दिल्या आणि अशोक भुस्कुटे यांचा विशेष सन्मान केला.

गोव्यातील मुक्कामानंतर २३ सप्टेंबर रोजी सर्व सहभागी मडगाव रेल्वे स्थानकावरून ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’ने परतीच्या प्रवासासाठी निघाले. रत्नागिरी व चिपळूण येथे आपापल्या टप्प्यावर उतरताना काही दिवस एकत्र घालवून निर्माण झालेल्या आठवणींमुळे सर्वांचे डोळे पाणावले होते.

मदतनीसांचे मोलाचे योगदान
ही सहल यशस्वी करण्यासाठी दिव्यांगांना उचलणे, व्हीलचेअरची व्यवस्था करणे आणि सुरक्षित ने-आण करण्याचे आव्हानात्मक काम समीर करीम नाकाडे यांनी विशेष परिश्रम घेऊन पार पाडले. तसेच भुस्कुटे यांच्या मानसकन्या साधना गुढेकर यांनीही गोव्यात मोलाची भूमिका बजावली.

अनेकदा घराचा उंबरठा ओलांडणे कठीण असलेल्या या दिव्यांगांसाठी हा केवळ प्रवास नव्हता, तर आत्मविश्वासाला नवी उंची देणारा आणि "स्वप्नांना कोणतीही सीमा नसते" हे सिद्ध करणारा ऐतिहासिक सोहळा ठरला.