राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ लागू; शेतकरी, विद्यार्थ्यांना विविध सरकारी सवलतींची घोषणा
रत्नागिरी :
चालू २०२६ च्या खरीप हंगामात पावसाने दिलेली मोठी दडी आणि प्रतिकूल हवामानामुळे राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या ३ प्रमुख तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार ‘दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६’ अंतर्गत ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) लागू करत मदत व पुनर्वसन विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
जून महिन्यापासून झालेल्या अपुऱ्या पर्जन्यमानामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधीत तालुक्यांमध्ये तातडीने उपाययोजना सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्व बाधित भागात पिकांचे पंचनामे सुरू केले जाणार असून, जीपीएस (GPS) कोऑर्डिनेट्स आणि फोटोंसह सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाईल.
शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रमुख सवलती:
दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने खालील महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत:

शेतकऱ्यांना दिलासा: जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्जवसुलीस तात्काळ स्थगिती.
वीज बिलात सूट: कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट तसेच टंचाईग्रस्त गावांमध्ये कृषी पंपांची वीजजोडणी खंडित न करण्याचे सक्त आदेश.
विद्यार्थी शुल्क माफी: बाधित भागातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ केले जाईल.
उपाजीविका व पाणीपुरवठा: रोजगार हमी योजनेची (मनरेगा) कामे शिथिल निकषांसह सुरू करणे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, जनावरांसाठी चारा-पाणी व्यवस्था आणि जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर हाती घेणे.
दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना मिळणारी थेट आर्थिक मदत आणि भरपाईची रक्कम विहित प्रक्रियेनंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे लवकरच जाहीर केली जाईल, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.













