यूएफबीयू (UFBU) आणि आयबीए (IBA) यांच्यातील बैठकीनंतर निर्णय; ५ दिवसांचा कामाचा आठवडा आणि जुनी पेन्शन मुख्य मागण्या
मुंबई: Bank Strike News Updates समोर येत असून बँकांचे व्यवहार करणाऱ्या देशभरातील कोट्यवधी ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. देशभरातील बँक कर्मचारी आजपासून, म्हणजेच २८ सप्टेंबर २०२६ पासून तीन दिवसांच्या संपावर जाणार होते; मात्र, हा संपाचा निर्णय अखेर स्थगित करण्यात आला आहे.
संपाच्या अवघ्या एक दिवस आधी रविवारी रात्री उशिरा इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक कामगार संघटनांची मुख्य संस्था युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर संप मागे घेण्याचा (स्थगित करण्याचा) निर्णय घेण्यात आला. मात्र, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर नेमका काय तोडगा निघाला आहे, याची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची होती शक्यता

आज २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक ‘UFBU’ कडून देण्यात आली होती. हा संप झाला असता तर चेक क्लिअरन्स, खात्यातून रोख रक्कम काढणे आणि जमा करणे यासारख्या सर्व महत्त्वाच्या बँकिंग सेवा ठप्प झाल्या असत्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, जुन्या खासगी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRB) या संपाचा मोठा फटका बसण्याची शक्यता होती.
दरम्यान, सप्टेंबर महिन्याचा चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी होती. मात्र, सलग पाच दिवस बँका बंद राहून ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवारी विशेषतः बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात आले होते.
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
बँक कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामागे काही दीर्घकालीन आणि महत्त्वाच्या मागण्या आहेत:
५ दिवसांचा कामाचा आठवडा (5-Day Work Week): बँकांमध्ये सध्याच्या ६ ऐवजी ५ दिवसांचा कामाचा आठवडा लागू करावा, ही कर्मचाऱ्यांची सर्वात मुख्य मागणी आहे.
संस्थांची उदाहरणे: NCBE चे महासचिव एल. चंद्रशेखर आणि AIBOC चे महासचिव रूपम रॉय यांच्या माहितीनुसार, केंद्र व राज्य सरकारची कार्यालये, आरबीआय (RBI), एलआयसी (LIC), जीआयसी (GIC), नाबार्ड तसेच शेअर बाजार आणि परकीय चलन बाजारातही आठवड्यातून केवळ ५ दिवस काम चालते; मग बँकांमध्ये का नाही? असा सवाल युनियनने केला आहे.
पेन्शन सुधारणा आणि महागाई भत्ता: सर्व पेन्शनधारकांसाठी एकसमान महागाई भत्ता (DA) धोरण लागू करण्यात यावे आणि पेन्शनच्या लाभात सुधारणा केली जावी.
जुनी पेन्शन योजना (OPS): राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ‘जुनी पेन्शन योजना’ (Old Pension Scheme) निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा.
वित्त मंत्रालयाचे चर्चेचे आवाहन
केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने बँक कर्मचाऱ्यांना आणि संघटनांना संपाचा मार्ग न स्वीकारता चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले होते. तसेच पीएलआय (PLI) योजना दीर्घ चर्चेनंतर या महिन्याच्या सुरुवातीलाच मागे घेण्यात आल्याचेही वित्त मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संप स्थगित झाल्यामुळे आज सोमवारपासून देशभरातील सर्व बँकिंग सेवा सुरळीत सुरू राहतील.













