राजीवडा येथील घटना; गंभीर जखमी विवाहितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू, रत्नागिरी शहर पोलिसांकडून तपास
रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका ३२ वर्षीय विवाहितेने शनिवार, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास मांडवी येथील अलहमपार्क इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिचा पती, सासू-सासरे आणि दोन आत्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाला विरोध अन् माहेरून फ्लॅटसाठी पैशांची मागणी
आशना इम्रान सुवर्णदुर्गकर (वय ३२, रा. राजीवडा, ता. जि. रत्नागिरी) असे गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. आशनाचा पती इम्रान याच्या घरातील नातेवाईकांचा या विवाहाला विरोध होता. या विरोधातूनच एप्रिल २०२६ पासून २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आशना हिला सासरच्या मंडळींकडून सतत त्रास दिला जात होता.
“तू फुकट आली आहेस, माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आण, नाहीतर आमच्या मुलाचा दुसरा विवाह करून देऊ” असे टोमणे मारत तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.

मुलांना ताबा न देणे अन् सततचा छळ
सासरच्या मंडळींकडून आशनाला घराबाहेर पडताना तिची पर्स तपासणे, कौटुंबिक कार्यक्रमांना जाऊ न देणे, तसेच तिच्या दोन लहान मुलांचा सांभाळ करू न देता मुलांना स्वतःकडे ठेवून आशनाला एकटीलाच माहेरी पाठवून दिले जात होते. गेल्या आठ दिवसांपासून ती आपल्या मुलांची मागणी करत होती, मात्र सासरच्या मंडळींनी तिला मुले देण्यास साफ नकार दिला होता.
या सर्व त्रासाला आणि छळाला कंटाळून २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आशना यांनी आपला मोबाईल घरातच ठेवून राजीवडा येथील घर सोडले.
चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न
घर सोडल्यानंतर संध्याकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अलहमपार्क मांडवी, रत्नागिरी येथील अपार्टमेंटच्या ‘आय’ (I-Wing) विंगच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारांसाठी चिंतामणी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत त्यांच्या उजव्या हाताला, उजव्या पायाला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
पतीसह ५ नातेवाईकांवर शहर पोलिसांत गुन्हा नोंद
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पती इम्रान खलील सुवर्णदुर्गकर, सासरे खलील सुवर्णदुर्गकर, सासू नसिरा सुवर्णदुर्गकर, पतीची आत्या सरवरी सुवर्णदुर्गकर आणि परवीन मुनाब सुवर्णदुर्गकर (सर्व रा. राजीवडा, रत्नागिरी) या पाच जणांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.













