Khed News: जगबुडी नदीकाठच्या बंदर रोडची दुरवस्था; खड्डे आणि सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त

Khed News: जगबुडी नदीकाठच्या बंदर रोडची दुरवस्था; खड्डे आणि सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त

खेड नगरपालिकेचे आरोग्य व स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष; दुरुस्ती व सुशोभीकरणाची स्थानिकांची मागणी

खेड : खेड शहरालगत वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जगबुडी नदी किनाऱ्यावरून जाणाऱ्या बंदर रोडची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले असून, दररोज या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पर्यायी मार्ग असणाऱ्या रस्त्यावर अपघाताचा धोका
खेड रेल्वे स्थानकाकडून भोस्ते मार्गे खेड शहरात न जाता थेट बहिरवली खाडी परिसराकडे जाण्यासाठी हा बंदर रोड अत्यंत सोयीचा मानला जातो. त्यामुळे या रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. मात्र, सध्या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

रस्त्यावर सांडपाणी सोडल्याने दुर्गंधी अन् आरोग्याचा प्रश्न
या मार्गावरील नदीकिनाऱ्यालगत असणाऱ्या इमारतींमधून बाहेर पडणारे सांडपाणी थेट रस्त्यालगतच्या परिसरात सोडले जात आहे. त्यामुळे या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांना नाक मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. उघड्यावर साठणाऱ्या या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Arihant 3

रस्त्याची दुरुस्ती अन् सुशोभीकरणाची मागणी
सुमारे एक किलोमीटर लांबीचा हा नदीकाठचा मार्ग योग्य पद्धतीने विकसित केल्यास खेड शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडू शकते. नदीकिनाऱ्याचे सुशोभीकरण, नियमित स्वच्छता, पथदीप आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्यास हा परिसर नागरिकांसाठी विरंगुळ्याचे केंद्र व पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होऊ शकतो. मात्र, सध्या खेड नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे या परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी आणि लोकप्रतिनिधींसह नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.