Rajapur News: भरधाव वाहनाची स्कुटीला जोरदार धडक; चालक गंभीर जखमी, राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

Rajapur News: भरधाव वाहनाची स्कुटीला जोरदार धडक; चालक गंभीर जखमी, राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

जवळथर-मिळंद सीमेवरील वळणावर अपघात; निष्काळजी वाहनचालकावर गुन्हा दाखल

राजापूर : जवळथर ते पाचल मार्गावरील जवळथर-मिळंद गावाच्या सीमेवरील वळणावर एका भरधाव अन् चुकीच्या बाजूने येणाऱ्या वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्कुटीचालक गंभीर जखमी झाला असून, ही घटना मंगळवारी (दि. २२) सकाळी ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात निष्काळजी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चुकीच्या बाजूने आणि भरधाव वेगाने वाहन चालवल्याचा आरोप

राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव गजानन पवार (वय ३६, रा. वरचीपेठ, राजापूर) हा ‘साई तन्मय ट्रॅव्हल्स’ची गाडी (क्र. एमएच ०१ ईव्ही ५४९५) चालवत होता. जवळथर-मिळंद सीमेवरील धोकादायक वळणावर त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन अतिशय भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने चालवले. याच वेळी समोरून येणाऱ्या हिरो कंपनीच्या प्लेझर स्कुटीला (क्र. एमएच ०८ ए.डब्ल्यू. ५३४८) त्याच्या वाहनाने जोरदार धडक दिली.

Hotel waiter

अपघातात स्कुटीचालक गंभीर, पोलिसांत विविध कलमांनुसार गुन्हा

या अपघातात स्कुटीचालक स्वरूप सुभाष सप्रे (वय ३४, रा. जवळथर, सुर्वेवाडी, ता. राजापूर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या स्कुटीचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी जखमींचे नातेवाईक स्मिता सुभाष सप्रे (वय ६२, रा. जवळथर, सुर्वेवाडी) यांनी राजापूर पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी, दि. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.२१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी गौरव पवार याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.