फोन उचलत नसल्याने उघडकीस आला प्रकार
रत्नागिरी: रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे-पाडावेवाडी येथील एक वृद्ध आपल्या राहत्या घरी बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. काशिनाथ पांडुरंग केळकर (वय ७६, रा. अनुराधा अपार्टमेंट, मिरजोळे पाडावेवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) घडली.
फोन उचलत नसल्याने उघडकीस आला प्रकार
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची खबर देणारे स्वप्निल दशरथ खेडेकर यांची बहीण आरती संतोष केळकर हिने फोन करून आपले सासरे काशिनाथ केळकर हे फोन उचलत नसल्याचे सांगितले आणि घरी जाऊन पाहण्यास सांगितले. त्यानुसार स्वप्निल हे अनुराधा अपार्टमेंट, मिरजोळे येथे गेले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी बाहेरून आवाज दिला आणि दरवाजा ठोठावला; मात्र आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
दरवाजा तोडून आत प्रवेश
काहीतरी अनुचित घडल्याचा संशय आल्याने अखेर सोसायटीमधील जमा झालेल्या नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडण्यात आला. आत जाऊन पाहिले असता काशिनाथ केळकर हे बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले.

त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (Accidental Death) म्हणून करण्यात आली आहे.













