गाव पांगारी सदा आणि पांगारी तर्फे हवेली जंगलात दापोली पोलिसांची कारवाई; मुद्देमालासह दोन संशयित ताब्यात
दापोली : दापोली तालुक्यातील पांगारी परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रीविरोधात पोलिसांनी शनिवारी धडक कारवाई केली आहे. देगाव पांगारी सदा आणि पांगारी तर्फे हवेली येथील जंगलात करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र छापा कारवायांमध्ये एकूण १६ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि कॅन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार दापोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई शनिवारी (दि. २६) दुपारी १.१० वाजण्याच्या सुमारास देगाव पांगारी सदा येथील जंगलात करण्यात आली. तेथे करवंदाच्या जाळीच्या आड झाडाखाली सुभाष गणू सकपाळ (वय ५६, रा. पांगारी बौद्धवाडी, ता. दापोली) हा बेकायदेशीरपणे विक्रीच्या उद्देशाने हातभट्टीची दारू बाळगून असताना पोलिसांना आढळला. त्याच्याकडून ९ लिटर गावठी दारू व कॅन असा ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्याच दिवशी दुसरी कारवाई दुपारी १.५५ वाजता पांगारी तर्फे हवेली, नवेशेत येथील जंगलात पार पडली. तेथे आंब्याच्या झाडाखाली अनंत महादेव सकपाळ (रा. पांगारी तर्फे हवेली बौद्धवाडी, ता. दापोली) हा हातभट्टीची दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून ७ लिटर गावठी दारू आणि कॅन असा ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या दोन्ही धडक कारवायांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बाळू दोबाडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दापोली पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.













