धोकादायक रीतीने दुचाकी उभी केल्याप्रकरणी खेडशी येथील तरुणावर ग्रामीण पोलीस ठाण्यात कारवाई
रत्नागिरी: शहराजवळील कारवांचीवाडी फाटा येथे इतर वाहनांच्या रहदारीस अडथळा व धोका निर्माण होईल अशा पद्धतीने दुचाकी उभी करणाऱ्या एका चालकाविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव सुरज रामचंद्र झेपले (वय ३९, रा. खेडशी, रत्नागिरी) असे आहे. याप्रकरणी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक महेश मुरकुटे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी संशयित आरोपी सुरज झेपले याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक MH-08-AL-1563) ही कारवांचीवाडी फाटा येथील मुख्य रस्त्यावर पार्क केली होती. दुचाकी अशा पद्धतीने उभी करण्यात आली होती, ज्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांच्या वाहतुकीला थेट अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका उत्पन्न झाला होता.

याप्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) अधिनियम २०२३ च्या कलम २८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास ग्रामीण पोलिसांकडून केला जात आहे.













