मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांवर दलालीचा गंभीर संशय
मुंबई : राज्यसभेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज एक नवा आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मोठी दारूगोळा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गातील तब्बल ९०० कोटी रुपयांची शेतजमीन बेकायदेशीर मार्गाने परप्रांतीय धनिकांना विकल्याचा थेट आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्गमध्ये ९०० कोटींचा व्यवहार
आरोपांची राळ उडवत संजय राऊत म्हणाले, “सिंधुदुर्गातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग या तीन महत्त्वाच्या तालुक्यांतील सुमारे ९०० कोटींची शेतजमीन आणि कृषी जमीन बंगळुरू, दिल्ली व हैदराबादमधील धनिकांना बेकायदेशीर मार्गाने विकण्यात आली आहे. जे लोक मुळात शेतकरीच नाहीत, अशा व्यक्तींना ही जमीन विकली गेली आहे.”
महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू असतानाही ही शेतजमीन बाहेरच्या लोकांच्या घशात घालण्यात आली असून, सध्या या बाहेरच्या लोकांनीच या जमिनींचा ताबा घेतला आहे, असा गंभीर दावा त्यांनी केला. महसूल खाते गेल्या तीन वर्षांपासून या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करत असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

मंत्रिमंडळातील कोकणातील नेते परप्रांतीयांचे पार्टनर?
संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील कोकणातील नेत्यांवर आणि मंत्र्यांवर थेट निशाणा साधला. “कोकणाचे जे नेते सध्या मंत्रिमंडळात आहेत, ते या प्रकरणात काय करत आहेत? ते या परप्रांतीयांचे पार्टनर बनून सर्व व्यवहार करत आहेत. या जमिनींवर सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर जंगलतोड सुरू आहे. मी स्वतः स्थानिक शिवसैनिकांना सोबत घेऊन तिथे जाऊन या सर्व भागाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
"फडणवीसांचा मेंदू जागेवर असेल तर नावे जाहीर करावीत"
या व्यवहारांवर प्रश्न उपस्थित करताना राऊत म्हणाले, “काही काळापूर्वी जयंत पाटील यांनीदेखील हा विषय मांडला होता, तरीही हे व्यवहार थांबलेले नाहीत. माझ्याकडे या संपूर्ण प्रकरणाची सर्व माहिती उपलब्ध आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेंदू जागेवर असेल, तर त्यांनी सर्वात आधी या खरेदीदारांची नावे जाहीर करावीत. या जमिनीचे व्यवहार कोणाच्या नावावर झाले आहेत आणि यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे जनतेसमोर आले पाहिजे.”
हिंदुत्ववादी मंत्री इस्टेट एजंट बनल्याचा आरोप
आपला हल्लाबोल तीव्र करत राऊत म्हणाले, “मंत्रिमंडळातला कोणता महान हिंदुत्ववादी मंत्री आणि आमदार कोकणातील शेतकऱ्यांच्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालण्याची दलाली करत आहे? इस्टेट एजंट बनून काम करणाऱ्या या मंत्र्याला किती कोटींची दलाली मिळाली? हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला ऐकायचे आहे. ९०० कोटी हा काही सामान्य आकडा नाही. हा ऑन-रेकॉर्ड व्यवहार आहे, ब्लॅकमधले पैशांचे व्यवहार वेगळेच आहेत.”













