Ratnagiri News: महायुतीतील तीन बड्या नेत्यांचा एकत्र प्रवास; नारायण राणे, उदय सामंत आणि सुनील तटकरेंच्या भेटीने कोकणात राजकीय चर्चांना उधाण

Ratnagiri News: महायुतीतील तीन बड्या नेत्यांचा एकत्र प्रवास; नारायण राणे, उदय सामंत आणि सुनील तटकरेंच्या भेटीने कोकणात राजकीय चर्चांना उधाण

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महायुतीची एकजूट

रत्नागिरी : सत्ताधारी महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये वरच्या पातळीवर असलेला सुसंवाद आता स्थानिक पातळीवरही दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन बडे नेते रत्नागिरीत एकत्र आल्याने कोकणच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार नारायण राणे, राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांची रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात भेट झाली.

एकाच गाडीतून तिन्ही नेत्यांचा एकत्र प्रवास
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) बैठकीसाठी हे तिन्ही नेते रत्नागिरीत आले होते. शासकीय विश्रामगृहात प्राथमिक चर्चा झाल्यानंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांनी एकाच गाडीतून एकत्र प्रवास केला. या नेत्यांमधील हे ‘खास बाँडिंग’ पाहून राजकीय गोटात तर्कवितर्कांना उधाण आले असून, गाडीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Samarth gold

गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी भेट टाळली?
दरम्यान, या घडामोडीत एक वेगळा राजकीय प्रसंगही पाहायला मिळाला. गृहराज्यमंत्री योगेश कदम हेदेखील शासकीय विश्रामगृहात आणि जिल्हा नियोजन बैठकीला उपस्थित होते. त्यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र खासदार सुनील तटकरे विश्रामगृहात येताच योगेश कदम यांनी त्यांची भेट घेणे टाळले.

दापोली विधानसभा मतदारसंघात योगेश कदम आणि सुनील तटकरे यांच्यात गेल्या काही काळापासून स्थानिक पातळीवर राजकीय वाद सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर कदमांनी तटकरेंना पाहून पाठ फिरवल्याने या घटनेचे राजकीय वर्तुळात वेगाने पडसाद उमटत आहेत.

दापोली अणूऊर्जा प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार: सुनील तटकरे
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी दापोलीतील प्रस्तावित प्रकल्पावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “दापोली अणूऊर्जा प्रकल्पाबाबत सामंजस्य करार झाल्याचे माझ्या वाचनात आले आहे. कोकणात कोणतेही रासायनिक किंवा प्रदूषक प्रकल्प येऊ नयेत, हीच कोकणवासीयांची मूळ भूमिका आहे. स्थानिक शेतकऱ्यांचाही याला विरोध असल्याचे माझ्या माहितीत आहे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “मी लवकरच दापोलीचा दौरा करून स्थानिक शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करणार आहे. त्यानंतर स्थानिकांची भूमिका थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडेन. अणूऊर्जा ही राष्ट्राची गरज असली, तरी दापोलीला निसर्गाचे मोठे वरदान लाभले आहे. तिथे पर्यटनावर आधारित रोजगार उपलब्ध आहे आणि ब्रिटिश काळापासून दापोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा सारासार विचार करूनच सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, ही माझी भूमिका असेल.”