Ratnagiri : आधार पडताळणीत रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसरा; ९८.२१ टक्के काम पूर्ण!

Ratnagiri : आधार पडताळणीत रत्नागिरी जिल्हा राज्यात दुसरा; ९८.२१ टक्के काम पूर्ण!

अपार आयडीमध्येही ९४.५७ टक्के प्रगती; २ हजार ५४९ विद्यार्थ्यांची पडताळणी प्रलंबित

रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीच्या कामात रत्नागिरी जिल्ह्याने मोठी बाजी मारली असून राज्यात दुसरे स्थान मिळवले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीचे तब्बल ९८.२१ टक्के काम पूर्ण झाले असून केवळ २ हजार ५४९ विद्यार्थ्यांची पडताळणी प्रलंबित आहे. संगमेश्वर आणि लांजा तालुक्यांनी यामध्ये विशेष आघाडी घेतली असून, येत्या काही महिन्यांत जिल्हा आधार पडताळणीत राज्यात अव्वल येण्याच्या मार्गावर आहे.

शासकीय योजना आणि शैक्षणिक कामाकाजासाठी प्रक्रिया महत्त्वाची
शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना विनाअडथळा मिळण्यासाठी तसेच शैक्षणिक कामकाजातील माहिती अचूक राहण्यासाठी विद्यार्थ्यांची आधार पडताळणी अत्यंत महत्त्वाची ठरते. जिल्हा शिक्षण विभागाच्या माध्यमातून आधार पडताळणीचे काम सातत्याने राबवण्यात आले. २०१-२३ पासून युडीआयएसई (UDISE+) प्लसच्या माध्यमातून राज्य व देशपातळीवर प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतंत्र माहिती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळांची संच मान्यता अचूक करणे आणि शैक्षणिक प्रवास ट्रॅक करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली.

ऑगस्टच्या आकडेवारीनुसार जिल्ह्याची कामगिरी
ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये जिल्ह्यात एकूण १ लाख ९१ हजार ६८२ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १ लाख ९१ हजार ८५ विद्यार्थ्यांचे आधार उपलब्ध आहेत. आतापर्यंत १ लाख ८८ हजार ४० विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली असून, उर्वरित सुमारे अडीच हजार (२,५४९) विद्यार्थ्यांचे काम प्रलंबित आहे. जिल्ह्याच्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत आधार उपलब्धतेचे प्रमाण अतिशय समाधानकारक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच अपार आयडी (APAAR ID) निर्मितीमध्येही जिल्ह्याने ९४.५७ टक्के प्रगती साधली आहे.

Naadi pariksha

लांजा व संगमेश्वर पुढे, मंडणगड पिछाडीवर
आधार पडताळणीच्या तालुकानिहाय टक्केवारीचा विचार करता संगमेश्वर (९८.७०%), लांजा (९८.६६%), रत्नागिरी (९८.५३%), गुहागर (९८.३५%), दापोली (९८.२८%), राजापूर (९७.९९%), खेड (९७.४१%) आणि चिपळूण (९७.३१%) अशी कामगिरी राहिली आहे. मात्र, मंडणगड तालुका ९५.७९ टक्क्यांसह पिछाडीवर राहिला आहे. मंडणगडसह इतर तालुक्यांत प्रलंबित कामे पूर्ण झाल्यास जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तालुकानिहाय आधार पडताळणीची आकडेवारी:
रत्नागिरी: झालेले काम – ४८,७४८ | प्रलंबित – ६१४

संगमेश्वर: झालेले काम – १६,५१६ | प्रलंबित – १९२

खेड: झालेले काम – २२,४८० | प्रलंबित – २९९

गुहागर: झालेले काम – ११,६७६ | प्रलंबित – ८९

चिपळूण: झालेले काम – ३७,१०७ | प्रलंबित – ७६५

लांजा: झालेले काम – ११,१०० | प्रलंबित – १२०

राजापूर: झालेले काम – १४,४९१ | प्रलंबित – २०९

दापोली: झालेले काम – २०,००२ | प्रलंबित – १७९

मंडणगड: झालेले काम – ५,९२० | प्रलंबित – ८२

एकूण: झालेले काम – १,८८,०४० | प्रलंबित – २,५४९