सागरी सीमा मंचाच्या पुढाकाराने रत्नागिरी आणि राजापुरातील ८८० स्वयंसेवकांचे मोठे योगदान; २५६ पिशव्यांमधून कचऱ्याची विल्हेवाट
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचे (International Coastal Cleanup Day) औचित्य साधून दक्षिण रत्नागिरी जिल्हा ‘सागरी सीमा मंच’च्या पुढाकाराने रत्नागिरी व राजापूर तालुक्यांतील तब्बल १३ प्रमुख समुद्रकिनाऱ्यांवर भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेतून तब्बल १५ टनांहून अधिक कचरा संकलित करण्यात आला आहे.
८८० स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग
विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था, शासकीय-निमशासकीय विभाग, उद्योगसमूह, व्यापारी, मच्छिमार संस्था, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांच्या उत्स्फूर्त सहभागातून हे अभियान यशस्वीरीत्या पार पडले. या अभियानात एकूण ८८० स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष किनाऱ्यावर उतरून काम केले आणि २५६ मोठ्या पिशव्यांमध्ये १५ टनांहून अधिक कचरा जमा केला.
रत्नागिरी अन् राजापुरातील ‘या’ १३ किनाऱ्यांची स्वच्छता
सागरी सीमा मंचाने जयगड ते आंबोळगड दरम्यानच्या किनारपट्टीवर या स्वच्छता मोहिमेचे नियोजन केले होते. यानुसार रत्नागिरी शहरातील मांडवी व पांढरा समुद्र, तसेच नांदिवडे, संदखोल, वरवडे, मालगुंड, गणपतीपुळे, काळबादेवी, मिऱ्या-शिवलकरवाडी, मिऱ्या-पाटीलवाडी, वेत्ये, कशेळी आणि राजापूर तालुक्यातील नाटे या १३ समुद्रकिनाऱ्यांवर हे अभियान राबवण्यात आले.

विसर्जनानंतर जमा झालेला कचरा केला गोळा
अनंत चतुर्दशीला पार पडलेल्या गणेश विसर्जनानंतर विविध किनाऱ्यांवर निर्माल्याच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या, थर्मोकोल आणि अन्य टाकाऊ कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता. या अभियानादरम्यान सर्व कचरा संकलित करण्यात आला. मांडवी व पांढरा समुद्र किनाऱ्यावर जमा केलेला कचरा रत्नागिरी नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घंटागाड्यांद्वारे वाहून नेला.
शासकीय विभाग, शाळा-महाविद्यालये अन् उद्योगांचे सहकार्य
या अभियानात रत्नागिरी नगरपालिका, विविध ग्रामपंचायती, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड (MMB), वन विभाग, कांदळवन कक्ष, आरोग्य विभाग, अंगणवाडी, सागरी पोलीस आणि सागरी जीवशास्त्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
शैक्षणिक क्षेत्रातून मालगुंडचे ब. प. विद्यालय, नाटे हायस्कूल, स्थानिक मराठी शाळा, यश फाउंडेशन, फाटक हायस्कूल, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, गोगटे-जोगळेकर कॉलेज, अभ्यंकर-कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज, भारत शिक्षण संस्थेचे सिनियर कॉलेज आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिला महाविद्यालयाचे विद्यार्थी-शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच वरवडे मच्छिमार सोसायटी, जिजामाता ग्रामसंघ (मालगुंड), नाटे तंटामुक्ती समिती, कर्तव्य प्रतिष्ठान (आडिवरे), इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन, लायन्स क्लब (हातखंबा), रिलायन्स फाउंडेशन आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब यांनी सहभाग नोंदवला. उद्योगांमधून जिंदाल, योमन मरीन, गद्रे मरीन आणि मरीन सिंडिकेटचे विशेष सहकार्य लाभले.













