Khed News: लोटे येथे कामावर गेलेला २३ वर्षीय तरुण अचानक गायब; खेड पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल

Khed News: लोटे येथे कामावर गेलेला २३ वर्षीय तरुण अचानक गायब; खेड पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल

वडिलांच्या फोननंतर घटना उघडकीस, पोलिसांकडून शोध सुरू

खेड (रत्नागिरी): तालुक्यातील खोपी येथील एका २३ वर्षीय तरुणाचे अज्ञात इसमाकडून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १४०(३) नुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘लोटे’ येथे जाण्यासाठी निघाला अन् गायब झाला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपहरणाची ही घटना १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास खोपी (ता. खेड) येथे घडली. सतीश बाळाजी गोरे (वय २३, मूळ रा. खोपी, सध्या रा. लोटे घाणेखंट, ता. खेड, जि. रत्नागिरी) हे १० ऑगस्ट रोजी सकाळी आपल्या ताब्यातील ‘हिरो एचएफ डिलिक्स’ मोटारसायकलवरून (क्रमांक MH 08 BB 0592) लोटे येथे कामासाठी निघून गेले होते.

कामाच्या ठिकाणी चौकशी अन् फोन बंद
त्याच दिवशी रात्री वडिलांनी सतीश यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी फिर्यादी व नातेवाईकांनी सतीश राहत असलेल्या ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. त्यावेळी सतीश हे गेल्या ५ ते ६ दिवसांपासून कामावर आलेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. नातेवाईकांकडे, मित्रांकडे आणि लोटे परिसरात सर्वत्र शोध घेऊनही त्यांचा काहीच पत्ता लागला नाही.

Ratnagiri Khabardar add image

खेड पोलिसांत अपहाराची फिर्याद
सतीश गोरे घरी न परतल्याने आणि त्यांचा कोणताही संपर्क होत नसल्याने, त्यांना कुणीतरी अज्ञात इसमाने गैरकायदेशीरपणे अडवून अपहरणाच्या उद्देशाने पळवून नेल्याचा दाट संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी फिर्यादी बाबू बाळाजी गोरे (वय ४०) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादीवरून खेड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहाराचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस अमंलदार या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. बेपत्ता तरुणाबाबत किंवा दुचाकीबाबत (MH 08 BB 0592) काही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.