Ratnagiri News: पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या ४३३ शिक्षकांना अखेर नियुक्ती पत्रे; ‘त्या’ २४ उमेदवारांचे पत्र रोखले

Ratnagiri News: पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या ४३३ शिक्षकांना अखेर नियुक्ती पत्रे; 'त्या' २४ उमेदवारांचे पत्र रोखले

टीईटी घोटाळ्यातील १३ संशयितांसह दिव्यांग व प्रकल्पग्रस्तांची कागदपत्र पडताळणी आता पुण्यात होणार; मान्यतेनंतरच नियुक्तीचा मार्ग मोकळा

रत्नागिरी : पवित्र पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्हा परिषदेला मिळालेल्या ४५७ शिक्षक उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण झाले आहे. त्यापैकी ४३३ उमेदवारांना प्रत्यक्षात नियुक्ती पत्रे देण्यात आली असून हे शिक्षक शाळांमध्ये रुजूही झाले आहेत. मात्र, उर्वरित २४ शिक्षकांची नियुक्ती पत्रे अद्याप रोखून धरण्यात आली आहेत. यामध्ये २०१८, २०१९ आणि २०२० मधील टीईटी (TET) घोटाळ्यातील १३ संशयित उमेदवारांसह दिव्यांग, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे.

१ हजारांहून अधिक पदे रिक्त; ४७८ पदांची भरती
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तब्बल १ हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यापैकी पवित्र पोर्टलद्वारे ४७८ शिक्षकांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत सलग तीन दिवस कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान २१ उमेदवार गैरहजर राहिले होते.

त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी ४५७ शिक्षकांचे समुपदेशन होणार होते; मात्र तांत्रिक कारणास्तव हे समुपदेशन दोन दिवस पुढे ढकलण्यात आले होते. अखेर २४ सप्टेंबर रोजी सर्व उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण करून त्यांना शाळांचे वाटप करण्यात आले.

Shanti real estate 1

२४ उमेदवारांना शाळांचे वाटप, मात्र नियुक्तीपत्रे प्रलंबित
समुपदेशनानंतर ४३३ शिक्षकांना तात्काळ नियुक्ती पत्रे बहाल करण्यात आली आणि त्यांनी संबंधित शाळांमध्ये पदभार स्वीकारला आहे. मात्र, उर्वरित २४ उमेदवारांना शाळांचे वाटप झाले असले तरी नियुक्ती पत्रे देण्यात आलेली नाहीत.

शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या २४ पैकी १३ उमेदवार हे बहुचर्चित टीईटी परीक्षा घोटाळ्यातील संशयित आहेत. तर उर्वरित ११ उमेदवार हे दिव्यांग, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त आरक्षणांतर्गत आलेले आहेत. या सर्व उमेदवारांच्या मूळ प्रमाणपत्रांची आणि कागदपत्रांची कसून तपासणी पुण्यात (शिक्षण आयुक्त कार्यालय/परीक्षा परिषद) केली जाणार आहे. पुण्यातून सकारात्मक अहवाल आणि संमती मिळाल्यानंतरच या २४ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.