Ratnagiri BJP News: आगामी निवडणुकांसाठी चिपळूणमध्ये भाजपची मंथन बैठक; गावपातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार

Ratnagiri BJP News: आगामी निवडणुकांसाठी चिपळूणमध्ये भाजपची मंथन बैठक; गावपातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार

आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक; तळागाळापर्यंत केंद्र-राज्य सरकारच्या योजना पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे आवाहन

रत्नागिरी / चिपळूण : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण चिंतन बैठक चिपळूण येथे पार पडली. भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत संघटनात्मक आढावा घेण्यात आला.

बूथ आणि गावपातळीवर संघटना बळकट करणार
बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले, “केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांचा थेट लाभ तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. भाजपची खरी ताकद ही बूथ आणि गावपातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये आहे.”

येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेता, प्रत्येक गावात पक्षाची बांधणी अधिक मजबूत करून पक्षाच्या विचारधारेसोबत अधिकाधिक नागरिकांना जोडण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ronic

सेवा संकल्प अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या राबवल्या जात असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ जिल्ह्यात व्यापक स्वरूप देण्याबाबत बैठकीत विशेष चर्चा झाली. सेवा, जनसंपर्क आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजनांचा सखोल अभ्यास करून पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या चिंतन बैठकीला जिल्हा परिषद सदस्य प्रमोद आधटराव, ओबीसी संपर्क प्रमुख संतोष नलावडे, अल्पसंख्याक अध्यक्ष लियाकत शाह, देवरूखच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उतेकर, पराग वडके, स्वानंद रानडे, मंडळ अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी, संगमेश्वर मंडळ अध्यक्ष विनोद म्हस्के, चिपळूणच्या उपनगराध्यक्षा डॉ. रूपाली दांडेकर यांच्यासह विविध मतदारसंघांतील भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.