जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरीतून मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा; हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन मित्रांचा गौरव
रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था, समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स (मुंबई) आणि पर्यटन संचालनालयातर्फे जागतिक पर्यटन दिन रत्नागिरीत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. येथील हॉटेल ‘विवा’ येथे आयोजित या विशेष सोहळ्यात रत्नागिरीच्या पर्यटन क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
रत्नागिरी आता गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना आकर्षित करतेय
समारंभात बोलताना राज्याचे उद्योग तथा पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, “रत्नागिरी जिल्हा आता गोव्याप्रमाणेच देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि पर्यटनाला गती देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. हॉटेल व्यवसाय तसेच फळप्रक्रिया व्यवसायांना अधिकृत उद्योगांचा दर्जा देण्याचा मानस आहे. असा दर्जा मिळाल्यास या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडतील. तसेच पुढील दोन वर्षांत पर्यटकांना एकाच छताखाली सर्व माहिती देणारे भव्य पर्यटन विकास केंद्र विकसित करण्यात येणार आहे.”
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार विमानसेवा
विमानतळाच्या विकासाबाबत माहिती देताना पालकमंत्री पुढे म्हणाले, “रत्नागिरी विमानतळावर एकेकाळी शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र, १७० कोटी रुपये खर्च करून येथील एअरस्ट्रिपची लांबी १४०० मीटरवरून २१०० मीटर आणि रुंदी ३० मीटरवरून ४५ मीटर करण्यात आली आहे. येथे आता ८२ सीटर (ATR) विमान सहज उतरू शकणार आहे. उडान योजनेअंतर्गत देशात एकमेव ठरेल अशी सुसज्ज आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच कोकणी संस्कृतीचे दर्शन घडवणारी टर्मिनल बिल्डिंग उभारली आहे. आगामी जानेवारी २०२७ च्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरीतून मुंबई आणि हैदराबादसाठी थेट प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे.”

दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, समृद्ध कोकणचे संस्थापक संजय यादवराव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि पर्यटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सुधीर तथा भाई रिसबूड यांनी केले तर सूत्रसंचालन राजेश आयरे यांनी केले.
पालकमंत्र्यांना ‘विशेष पर्यटन मित्र’ सन्मान; गुणवंतांचा गौरव
कार्यक्रमात पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांच्या हस्ते पालकमंत्री उदय सामंत यांना ‘विशेष पर्यटन मित्र सन्मान’ प्रदान करण्यात आला.
तसेच पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुदेश शेट्ये, सतीश कदम, संजय वैशंपायन, सौ. अमृता करंदीकर, ययाती शिवलकर, गौरेश फाळके, गौरव जोशी, महेंद्र मयेकर, प्रसाद देवस्थळी, ओम पाडाळकर, राधेय पंडित, सौ. शहनाज काझी, मानसी यादवराव, आनंद तायशेटे आणि भरत मोरे यांना ‘पर्यटन मित्र पुरस्कार’, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.













