Maharshi Karve Mahila Mahavidyalaya Ratnagiri: महर्षी कर्वे महिला महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ उत्साहात साजरा; आठवडाभर विविध उपक्रमांची रेलचेल

Maharshi Karve Mahila Mahavidyalaya Ratnagiri: महर्षी कर्वे महिला महाविद्यालयात 'राष्ट्रीय सेवा योजना दिन' उत्साहात साजरा; आठवडाभर विविध उपक्रमांची रेलचेल

प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाईंचे प्रेरणादायी व्याख्यान; मांडवी किनारी स्वच्छता आणि आरोग्य तपासणी शिबिराने ‘एनएसएस सप्ताह’ संपन्न

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी येथे ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) दिनाचे औचित्य साधून ‘NSS Day Week Celebration’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा, पर्यावरणीय बांधिलकी आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

‘स्वयंसेवकत्व’ संकल्पनेवर मार्गदर्शनपर व्याख्यान
उपक्रमाची सुरुवात गुरुवारी (२४ सप्टेंबर २०२६) एनएसएस स्वयंसेवकांसाठी आयोजित विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाने झाली. या कार्यक्रमाला गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या भूगोल व ग्रामीण विकास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना डॉ. ठाकुरदेसाई म्हणाले, “कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता समाजाच्या हितासाठी आपला वेळ, श्रम, कौशल्य आणि ज्ञान देणे हीच खरी स्वयंसेवकत्वाची (Volunteerism) भावना आहे.” त्यांनी NSS च्या माध्यमातून राबवता येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

Shree clinic

मांडवी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम
शनिवारी (२६ सप्टेंबर २०२६) ‘सागरी सीमा मंच, रत्नागिरी’च्या सहकार्याने ऐतिहासिक मांडवी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सकाळी ७:३० वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात महाविद्यालयातील ३४ NSS स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनानंतर किनाऱ्यावर साचलेले निर्माल्य, प्लास्टिक आणि इतर टाकाऊ कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाचे धडे मिळाले.

७८ स्वयंसेवकांची आरोग्य अन् हिमोग्लोबीन तपासणी
सप्ताहाचा सांगता उपक्रम म्हणून सोमवारी (२८ सप्टेंबर २०२६) ‘लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी’च्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्त व डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ७८ NSS स्वयंसेवकांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करणे आणि नियमित तपासणीचे महत्त्व पटवून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित ओसवाल, माजी अध्यक्ष संजय पटवर्धन, सचिव ललित ओसवाल, झोन चेअरमन शिल्पा पानवलकर आणि शिबिराचे प्रायोजक श्री. मणियार उपस्थित होते.

मार्गदर्शन व नियोजन
या सर्व उपक्रमांचे यशस्वी आयोजन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था (पुणे) चे कार्याध्यक्ष तथा रत्नागिरी प्रकल्पाचे अध्यक्ष रवींद्र देव आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा कोतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन एनएसएस कार्यक्रम अधिकारी सहायक प्राध्यापिका श्रुती यादव यांनी केले. या आठवडाभर चाललेल्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा आणि नागरिक म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक प्रगल्भ झाली.