Ratnagiri News: शैक्षणिक गुणवत्तेत रत्नागिरी जिल्हा राज्यात अग्रेसर होण्यासाठी काम करा

Ratnagiri News: शैक्षणिक गुणवत्तेत रत्नागिरी जिल्हा राज्यात अग्रेसर होण्यासाठी काम करा

नोडल अधिकारी महेश चोथे यांच्या शाळा पाहणीनंतर केंद्रप्रमुख व अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा भौतिक सुविधांमध्ये स्वयंपूर्ण व्हावा आणि शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात अग्रेसर राहावा यासाठी सर्वांनी गतीने काम करावे, अशा स्पष्ट सूचना नोडल अधिकारी महेश चोथे यांनी दिल्या आहेत. ‘चला शाळेत जाऊया’ या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत नोडल अधिकारी महेश चोथे यांनी रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यातील विविध शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विभागातील विविध अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

शिक्षवृत्ती परीक्षा निकाल सुधारण्यासाठी विशेष मेहनतीचे निर्देश
बैठकीत मार्गदर्शन करताना महेश चोथे म्हणाले की, शाळेची गुणवत्ता आणि शाळांमधील सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जिल्हा शिष्यवृत्ती परीक्षेत मागे राहिला असून जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. विशेषतः इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षक व शिक्षण विभागाने विशेष मेहनत घेणे आवश्यक आहे. याशिवाय विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि शालेय परिसर स्वच्छ असण्यावरही त्यांनी भर दिला.

आधार सीडिंगमध्ये जिल्हा पहिल्या क्रमांकावर आणण्याचे आवाहन
शालेय प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेताना आधार वैधता, प्रमाणीकरण आणि अपार आयडी वैधता ही कामे वेळेवर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आधार सीडिंगमध्ये रत्नागिरी जिल्हा सध्या राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उर्वरित प्रलंबित कामे लवकर पूर्ण करून आधार सीडिंगमध्ये जिल्ह्याला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणावे, असे आवाहन नोडल अधिकारी चोथे यांनी केले.

Ronic

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा तिसरा टप्पा
‘चला शाळेत जाऊया’ या अभियानाचे दोन टप्पे यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तिसरा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात नोडल अधिकारी पुन्हा रत्नागिरीच्या दौऱ्यावर येणार असून उर्वरित तालुक्यातील शाळांची पाहणी करणार आहेत. त्यामुळे सर्व शाळांनी पूर्वतयारी पूर्ण करून ठेवावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.