राधाकृष्ण नागरी सहकारी पतपेढीची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

राधाकृष्ण नागरी सहकारी पतपेढीची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर
संस्थेला १४.८५ लाखांचा निव्वळ नफा; सलग १२ वर्षे ‘अ’ वर्ग मिळवून आर्थिक शिस्तीचा आदर्श कायम

रत्नागिरी : राधाकृष्ण नागरी सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी हॉटेल व्यंकटेश येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष हेमंत वणजू यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. सभासदांचा अतूट विश्वास, संचालक मंडळाचे दूरदृष्टी नियोजन आणि कर्मचारीवर्गाचे प्रामाणिक योगदान यामुळे पतसंस्थेने आर्थिक प्रगतीची घोडदौड अविरत कायम ठेवली असून चालू आर्थिक वर्षात संस्थेला १४ लाख ८५ हजार ९८९ रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. या नफ्यातून सभासदांसाठी १० टक्के लाभांश (डिव्हिडंड) जाहीर करण्यात आला आहे.

सलग १२ वर्षे मिळवला ‘अ’ वर्ग :

राधाकृष्ण पतपेढीची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे संस्थेने सलग १२ वर्षे लेखापरीक्षणात (ऑडिट) ‘अ’ वर्ग मिळवण्याचा ऐतिहासिक बहुमान पटकावला आहे. कडक आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि सहकार खात्याच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन यामुळेच संस्थेला आपले हे निर्विवाद यश आजतागायत टिकवून ठेवता आले आहे.

Amey jwelrs

संस्था पूर्णपणे कर्जमुक्त आणि स्वावलंबी :

संस्थेवर कोणत्याही बाहेरील वित्तीय संस्थेचे वा बँकेचे कर्ज नसून, संस्था पूर्णपणे स्वतःच्या सभासदांच्या ठेवींवर आणि अंतर्गत भांडवलावर आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे वाटचाल करत आहे. आर्थिक सुरक्षिततेचा भाग म्हणून संस्थेने विविध सुरक्षित पर्यायांमध्ये एकूण १ कोटी ५ लाख ७६ हजार २६३ रुपयांची भरीव गुंतवणूक केलेली आहे.

आदर्श आर्थिक निकषांचे तंतोतंत पालन; अध्यक्ष हेमंत वणजू :

अध्यक्षीय भाषणात बोलताना हेमंत वणजू म्हणाले की, सुरक्षित कर्जवाटप, काटेकोर आर्थिक शिस्त तसेच सी.डी. रेशो, सीआरआर, एसएलआर, सीआरएआर आणि एबीआर या सर्व तांत्रिक व आर्थिक निकषांचे आदर्श प्रमाण राखल्यामुळेच पतपेढी यशाची उत्तुंग शिखरे गाठू शकली आहे. ही झालेली प्रगती सभासदांच्या निस्सीम विश्वासाची खरी पावती असून भविष्यातही पतपेढीच्या सर्वांगीण विकासासाठी सभासदांनी असाच सक्रिय सहभाग नोंदवून विश्वास दृढ ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

मान्यवरांची उपस्थिती आणि संयोजन :

या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संस्थेचे उपाध्यक्ष गणेश भिंगार्डे, सचिव मकरंद खातू, तज्ज्ञ संचालक सतीश उर्फ दादा दळी, धनेश रायकर, संचालक निखिल देसाई, सिद्धार्थ बेंडके, ब्रिजेश साळवी, मृत्युंजय खातू, अल्पना संसारे, मिलिंद दळी तसेच ऑडिटर गिरकर, सर्व कर्मचारी आणि बहुसंख्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.