भगवती मंदिर परिसरात दुचाकीचे ब्रेक फेल होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

भगवती मंदिर परिसरात दुचाकीचे ब्रेक फेल होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात प्राणज्योत मालवली; रत्नागिरी शहर पोलिसांत नोंद

रत्नागिरी :

रत्नागिरी दुर्घटना प्रकरणी भगवती मंदिर परिसरात दुचाकीचे अचानक ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. डेरवण येथील बालाजी बिर्ला वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. प्रेम भिम ओड (वय ३०, रा. गोडावून स्टॉपजवळ, कोहिनूर सोसायटी, ता. व जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

या अपघाताबाबत मृत प्रेम ओड यांचे भाऊ बलदेव भिम ओड यांनी पोलिसांत माहिती दिली आहे. १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास रत्नागिरीतील भगवती मंदिर परिसरात प्रेम ओड हे आपल्या दुचाकीवरून जात असताना अचानक दुचाकीचे ब्रेक फेल झाले. या अनपेक्षित अपघातात त्यांच्या पोट आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती.

Gadre1

रत्नागिरी ते डेरवण रुग्णालयात उपचार
अपघातानंतर प्रेम ओड यांना तातडीने रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारांसाठी परकार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्या आतड्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील बालाजी बिर्ला वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

शस्त्रक्रियेनंतर उपचारादरम्यान मृत्यू
वालावलकर रुग्णालयात वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती व उपचार सुरू होते. मात्र, २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक खालावली. रक्तदाब अत्यंत कमी झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सीपीआर देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सावर्डे पोलिसांकडून कागदपत्रे रत्नागिरीकडे वर्ग
ही घटना रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे, सुरुवातीला सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (अ.मृ. रजि. नं. ००/२०२६, बी.एन.एस.एस. १९४) नोंद करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी संबंधित कागदपत्रे रत्नागिरी शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहेत.