कोकण व विदर्भातील प्रवाशांची सोय; एलटीटी-मडगाव आणि सीएसएमटी-नागपूर मार्गावर ४ ऑक्टोबरपर्यंत धावणार स्पेशल ट्रेन्स
मुंबई : ऑक्टोबर महिन्यातील सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या काळात कोकण आणि विदर्भाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर दरम्यान एकूण ८ विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
१) एलटीटी – मडगाव – एलटीटी साप्ताहिक विशेष (४ सेवा)
गाडी क्रमांक ०१०२९ (LTT ते मडगाव): ही गाडी २ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) आणि ४ ऑक्टोबर २०२६ (रविवार) रोजी एलटीटी येथून मध्यरात्री ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल (२ सेवा).

गाडी क्रमांक ०१०३० (मडगाव ते LTT): ही गाडी २ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) आणि ४ ऑक्टोबर २०२६ (रविवार) रोजी मडगाव येथून दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ०३:४५ वाजता पोहोचेल (२ सेवा).
प्रमुख थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.
कोच रचना: ४ एसी ३-टायर, ११ स्लीपर क्लास, ५ जनरल क्लास आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅन.
२) सीएसएमटी – नागपूर – सीएसएमटी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (४ सेवा)
गाडी क्रमांक ०२१४१ (CSMT ते नागपूर): ही गाडी २ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) आणि ४ ऑक्टोबर २०२६ (रविवार) रोजी सीएसएमटी येथून मध्यरात्री ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:३५ वाजता नागपूर येथे पोहोचेल (२ सेवा).
गाडी क्रमांक ०२१४२ (नागपूर ते CSMT): ही गाडी २ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) आणि ४ ऑक्टोबर २०२६ (रविवार) रोजी नागपूर येथून सायंकाळी १६:५० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:२० वाजता पोहोचेल (२ सेवा).
प्रमुख थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी (केवळ गाडी क्र. ०२१४२ साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
आजपासून बुकिंग सुरू
या विशेष गाड्यांमधील ०१०२९, ०२१४१ आणि ०२१४२ या गाड्यांसाठीचे आरक्षण १ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व संगणकीय पीआरएस (PRS) केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) सुरू झाले आहे. या गाड्यांमुळे कोकणात गणेशोत्सव/नवरात्र व विदर्भात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.













