पिंपळ, उंबराच्या मुळांमुळे काँक्रीटला तडे जाण्याची भीती; जि. प. बांधकाम विभागाने लक्ष देण्याची ग्रामस्थांची अपेक्षा
सावर्डे :
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील उदेगवाडी मार्गावरील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील महत्त्वाच्या पुलावर मोठ्या प्रमाणात उंबर, पिंपळ यांसारखी झाडे तसेच विविध प्रकारची अनावश्यक झुडपे उगवली आहेत. यामुळे पुलाच्या मूळ संरचनेलाच गंभीर धोका निर्माण झाला आहे. या वनस्पतींची मुळे पुलाच्या भिंती आणि कठड्यांमध्ये खोलवर शिरल्याने काँक्रीटला तडे जाण्याची आणि पुलाचे आयुष्य घटण्याची तीव्र चिंता स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
उदेगवाडी, कासारवाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग
हा पूल उदेगवाडी, कासारवाडी तसेच परिसरातील इतर वाड्यांना जोडणारा मुख्य आणि अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. दररोज या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या या झाड-झुडपांमुळे भविष्यात पुलाचे मोठे नुकसान होऊन वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
देवराज गरगटे व रुपेश कोकाटे यांच्याकडून पाहणी
या गंभीर समस्येची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांस्कृतिक व चित्रपट विभागाचे जिल्हाध्यक्ष देवराज गरगटे यांनी समाजसेवक रुपेश कोकाटे यांच्यासमवेत पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान पुलाच्या कठड्यांमध्ये आणि बाजूच्या संरक्षक भिंतींमध्ये झाडांची मुळे अत्यंत खोलवर गेल्याचे स्पष्ट निदर्शनास आले.
यावेळी देवराज गरगटे यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष या समस्येकडे वेधले, तसेच जि. प. सदस्या पूजा निकम यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. पुलावर उगवलेली उंबर, पिंपळ व इतर झाडे मुळासकट काढून टाकण्याची आणि पुलाची नियमित देखभाल-दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पूर्ण पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाने तातडीने साफसफाई व संरक्षक उपाययोजना करून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 03-10-2026














