विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेतच नशेपासून दूर राहावे: पोलीस उपअधीक्षक आकांक्षा यादव यांचे आवाहन

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नशामुक्ती अभियान; १५०० हून अधिक विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्त समाजाचा संकल्प

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेतच स्वतःचे ध्येय निश्चित केले पाहिजे आणि नशेसारख्या घातक गोष्टींपासून दूर राहायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन रत्नागिरीच्या पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) आकांक्षा यादव यांनी केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात नशामुक्ती अभियानाअंतर्गत खातू नाट्यमंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.

मित्र-मैत्रिणींच्या दबावाला नकार द्या; सजग राहा!

उपस्थितांना मार्गदर्शन करताना आकांक्षा यादव म्हणाल्या, “या वयातच योग्य निर्णय घेतलात तर तुमचे भविष्य उज्ज्वल होईल. अनेकदा मित्र-मैत्रिणी किंवा जवळच्या व्यक्ती एकदा नशा करून बघण्याचा सल्ला देतात; पण त्याच वेळी ठामपणे ‘नकार’ दिला पाहिजे. त्या क्षणी दिलेला एक चुकीचा होकार तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने सदैव सजग आणि सतर्क राहिले पाहिजे.”

यावेळी त्यांनी नशामुक्तीसंदर्भात कोणतीही मदत किंवा माहिती हवी असल्यास थेट पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. “मी मूळची हरियाणाची असून आयपीएस (IPS) झाल्यावर माझे पहिलेच पोस्टिंग रत्नागिरीत झाले आहे,” असे सांगत त्यांनी मोठ्या बहिणीच्या नात्याने अतिशय सोप्या आणि आपुलकीच्या भाषेत विद्यार्थ्यांना नशेपासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला दिला.

Radhakrushna patapedhi

संवाद हाच समस्यांवर उपाय; १५०० विद्यार्थ्यांची नशामुक्तीची शपथ

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नशा करणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय असू शकत नाही. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी किंवा शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे.

यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचा दृढ संकल्प केला.

एनएसएसच्या (NSS) विद्यार्थ्यांचे प्रभावी पथनाट्य

कार्यक्रमा दरम्यान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) स्वयंसेवकांनी व्यसनमुक्ती विषयावर अत्यंत प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्याद्वारे व्यसनाच्या भयंकर दुष्परिणामांची जाणीव करून देत नशामुक्त आणि निरोगी जीवनाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला खातू नाट्यमंदिरात १५०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक व ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 03-10-2026