खवळलेल्या समुद्रात धोका पत्करून पर्यटनाचा आनंद; आरे-वारे किनाऱ्यावर बुडणाऱ्या दोन स्थानिकांना स्थानिक तरुणांनी वाचवले
कोकण किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी झाल्याचे चित्र सलग मिळालेल्या सुट्ट्यांमुळे शुक्रवारी पाहायला मिळाले. मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांनी विकेंडचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, आरे-वारे, नेवरे, गुहागर आणि दापोलीच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर मोठी गर्दी केली आहे. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) एकच दिवशी प्रसिद्ध श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिरात सुमारे २५ हजार भक्तांनी दर्शन घेतले. किनाऱ्यांवर पर्यटकांचा राबता वाढला असतानाच, दुपारपासून वाहणाऱ्या हलक्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून अनेक पर्यटक धोका पत्करून पाण्यात उतरत असल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
आरे-वारे किनाऱ्यावर तरुणांचा तत्परतेने दोन पर्यटकांना जीवदान
शुक्रवारी आरे-वारे किनाऱ्यावर पाण्यात उतरलेले रत्नागिरीतील दोन पर्यटक पाण्याचा आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने अचानक बुडू लागले. पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे ते वाहून जात असतानाच, किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या झिपलाईन चालवणाऱ्या स्थानिक तरुणांनी देवदूतासारखे धावून जात तत्परतेने पाण्यात उड्या मारून दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच आरेचे पोलीस पाटील आदेश कदम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सहकार्य केले. नुकतीच रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथे सहलीसाठी आलेले विद्यार्थी बुडाल्याची घटना घडल्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धोकादायक भोवरे आणि पर्यटकांचे सूचनेकडे दुर्लक्ष
शाळा आणि महाविद्यालये सुरू असली तरी पर्यटकांचा ओघ किनाऱ्यांवर कायम आहे. शुक्रवारी सायंकाळी आरे-वारे किनाऱ्यावर मावळता सूर्य पाहण्यासाठी नवविवाहित दांपत्ये आणि तरुणाईची मोठी गर्दी झाली होती. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या उंच लाटांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक थेट पाण्यात उतरत आहेत. मात्र, भरतीच्या वेळी समुद्रात अचानक भोवरे तयार होत असल्याने हा बिनधास्तपणा जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक व्यावसायिक आणि जीवरक्षक पर्यटकांना सातत्याने सूचना देऊन सतर्क करत आहेत; परंतु अनेक पर्यटक या धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
आरे-वारे किनाऱ्यावर होमगार्ड्स नियुक्तीची स्थानिकांची मागणी
जुलै महिन्यात गणपतीपुळे येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनाने आरे-वारे किनाऱ्यावर सुरक्षेसाठी होमगार्ड्सची नियुक्ती केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही ड्युटी थांबवण्यात आली आहे. येत्या शनिवार आणि रविवारी पर्यटकांची संख्या आणखी वाढणार असल्याने किनाऱ्यावर सुरक्षेसाठी होमगार्ड्सची नियुक्ती पुन्हा कायम ठेवावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
“आरे-वारे किनाऱ्यावर समुद्र आणि खाडी एकत्र येण्याच्या ठिकाणी पर्यटक पोहायला गेले तर मोठी दुर्घटना घडण्याची भीती असते. सध्या समुद्राच्या पाण्याला तीव्र करंट असल्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. पर्यटकांनी कोणत्याही परिस्थितीत खोल पाण्यात उतरू नये.”
— आदेश कदम, पोलीस पाटील, आरे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 03-10-2026















