एलसीबीची जाकादेवी येथे कारवाई; २५ लिटर हातभट्टीची दारू जप्त, राजापुरात बारामतीच्या चौघांवर कारवाई
रत्नागिरी :
विक्रीसाठी बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या एकासह सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत आढळलेल्या चौघांविरोधात रत्नागिरी आणि राजापूर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या दोन्ही स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण पाच जणांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जाकादेवी जंगलमय भागात एलसीबीचा छापा
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी ते ओरी जाणाऱ्या मार्गालगतच्या जंगलमय परिसरात विक्रीच्या उद्देशाने गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी सुरेश बाळू गोताड (वय ५०, रा. चाफे, मधलीवाडी, जाकादेवी) याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२.१७ वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने ही कारवाई केली. एलसीबीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल भैरवनाथ सवाईराम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित गोताड हा जंगलमय भागात २,७०५ रुपये किमतीची २५ लिटर गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगून असल्याचे रंगेहाथ आढळून आले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
राजापुरात बारामतीतील चौघे मद्यधुंद अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात
दुसऱ्या घटनेत, राजापूर तालुक्यातील खरवते येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धुंद अवस्थेत आढळलेल्या चौघांविरोधात राजापूर पोलिसांनी कारवाई केली. ३० सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास महामार्गाच्या शेजारी सार्वजनिक ठिकाणी काही व्यक्ती मद्यप्राशन करत असताना पोलिसांना आढळून आल्या.
त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांविरोधात स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. यामध्ये अमर भगवान साळुंके (वय ४७), सागर विजय गवळी (वय ३६), रोशन पोपट गायकवाड (वय २५) आणि संतोष पुंडलिक पानसरे (वय ४७) यांचा समावेश आहे. हे चौघेही पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील रहिवासी असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अनुक्रमे रात्री ८.५५, ९.१७, ९.३८ आणि ९.५५ वाजता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:45 03-10-2026














