राजापूर तहसील कार्यालयात सोमवारी महसूल लोक अदालत

‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियाना’अंतर्गत ५ ऑक्टोबरला आयोजन; प्रलंबित प्रकरणे आपापसांत निकाली काढण्याचे आवाहन

राजापूर :

महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायालयीन प्रकरणे आपापसांतील तडजोडीने आणि दोन्ही पक्षांच्या संमतीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागातर्फे ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राजापूर तहसील कार्यालयात येत्या सोमवारी, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महसूल लोक अदालतीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील संबंधित पक्षकार, नागरिक व शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विकास गंभेरे यांनी केले आहे.

दर तीन महिन्यांनी होणार लोक अदालतीचे आयोजन

शासनाच्या निर्देशानुसार, हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येत असून, दर तीन महिन्यांनी महसूल लोक अदालत आयोजित केली जाणार आहे. या लोक अदालतीच्या माध्यमातून तहसील कार्यालयाकडे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या अर्धन्यायालयीन प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने तडजोड घडवून आणून वाद कायमचे निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Ratnagiri Khabardar add image

जमिनीचे वाद अन् वहिवाटीच्या रस्त्यांचे प्रश्न सुटणार

या महसूल लोक न्यायालयामध्ये प्रामुख्याने जमिनीचे हिस्से व हक्क, जमिनीच्या वाटपाचे दावे तसेच वहिवाटीच्या रस्त्यांबाबतचे वाद आपापसांतील तडजोडीने व संमतीने निकाली काढण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात किंवा तहसील पातळीवर प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील पक्षकारांना परस्पर सहमतीने वाद संपुष्टात आणून मार्ग मोकळा करता येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 03-10-2026