मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभारावर सडकून टीका; ‘व्होट चोरी’ आणि १३ कोटी मतदार वगळल्याचा उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
*मुंबई :* मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कारभाराविरोधात तसेच देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी रविवारी मुंबईत भव्य ‘गर्जना मोर्चा’चे (Garjana Morcha) आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले. केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धोरणांवर दोन्ही नेत्यांनी कडाडून हल्लाबोल केला.
*’हा लढा स्वातंत्र्याचा लढा आहे’*
मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “हा लढा कोणत्याही एका पक्षाचा, व्यक्तीचा अथवा जातपात-धर्माचा नसून, देशाच्या स्वातंत्र्याचा लढा आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ घोषणेचा उल्लेख करत ते म्हणाले, “देशात हुकूमशाह तयार होत असेल, तर त्याला याच देशाच्या मातीत गाडण्यासाठी आज संपूर्ण जनता आणि आम्ही एकत्र आलो आहोत.”
*१३ कोटी मतदार वगळल्याचा गंभीर आरोप*
राज ठाकरे यांनी मांडलेल्या आकडेवारीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्रातील २ कोटी आणि संपूर्ण देशातील तब्बल १३ कोटी मतदारांची नावे अचानक मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये ३० लाख तर तामिळनाडूमध्ये ७० लाख मतदार वगळले गेल्याचे सांगत, निवडणुका निष्पक्ष न होता प्रशासकीय संस्थांवर कब्जा मिळवला जात असल्याची टीका त्यांनी केली.

*मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीवर आक्षेप*
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेमणूक प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेताना ठाकरे म्हणाले, “पूर्वी निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीत सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते असायचे. मात्र कायद्यात बदल करून सरन्यायाधीशांना काढून गृहमंत्र्यांचा समावेश करण्यात आला.” ही नेमणूक पूर्णपणे पक्षपातीपणाने करण्यात आली असून, ज्ञानेश कुमार हे सरकारचे हत्यार म्हणून काम करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
*’भाजपाला सरकार चालवता येत नाही’*
प्रशासकीय अपयशावरून सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाला सरकार चालवता येत नाही. प्रशासन आणि भाजप हे दोन परस्परविरोधी शब्द आहेत.” ठाण्यातील पूर्णेकर यांच्या हत्येचा आणि देशभरातील महिलांवरील अत्याचारांचा उल्लेख करत गृह खात्याच्या कारभारावर आणि सरकारच्या हिंदुत्वाच्या दाव्यावर त्यांनी जोरदार ताशेरे ओढले. “संस्था आणि प्रशासन तुम्ही ताब्यात घेतले असले, तरी हे रस्ते जनतेच्या मालकीचे आहेत; उद्या तुम्हाला या रस्त्यांवर फिरणे मुश्किल होईल,” असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.













