महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत तिघांवर गुन्हे दाखल; रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलिसांनी केली कारवाई
*रत्नागिरी :* जिल्ह्यात चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान संशयितांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. चिपळूण, संगमेश्वर आणि लांजा या तीन वेगवेगळ्या तालुक्यांत रात्रीच्या व पहाटेच्या वेळी चोरीच्या उद्देशाने किंवा स्वतःचे अस्तित्व लपवून संशयास्पद रित्या फिरणाऱ्या तीन जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
*१. चिपळूण: पहाटेच्या सुमारास बिहारच्या तरुणाला पकडले*
चिपळूण तालुक्यातील मौजे कळंबस्ते येथील मराठी शाळेजवळ ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ४:४५ वाजण्याच्या सुमारास पहिली कारवाई करण्यात आली. सूर्योदयापूर्वी अंधाराचा फायदा घेऊन स्वतःचे अस्तित्व लपवून संशयितरित्या उभा असलेला अर्जनकमार बाल्मिकी सहा (वय २७, रा. पंडितपूर, जि. गोपाळगंज, बिहार) हा पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. चौकशीदरम्यान त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर न दिल्याने, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राकेश मनोहर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*२. संगमेश्वर: हनुमान मंदिराच्या पाठीमागे लपलेल्या इसमावर गुन्हा*
दुसरी कारवाई संगमेश्वर ते देवरूख रस्त्यावरील हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस ३ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. मनोजकुमार रामप्रकाश (वय ३२, मूळ रा. रुदलापूर, जि. सिद्धार्थनगर, सध्या रा. शास्त्रीपुल, संगमेश्वर) हा इसम चोरी करण्याच्या उद्देशाने आडोशाला लपून फिरताना आढळला. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संकेत सोपान आटोळे यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ (क) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

*३. लांजा: रेकॉर्डवरील सराईत चोरटा लांजा पोलिसांच्या जाळ्यात*
तिसरी कारवाई लांजा बाजारपेठेतील कोत्रे हॉटेलजवळ (मुंबई-गोवा महामार्ग शेजारी, गोंडेसखल रोड) ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:५० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. लांजा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपी अनंत राजाराम रेवाळे (वय ३५, रा. गवाणे, ता. लांजा) हा रात्रीच्या वेळी चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या फिरताना पोलिसांना मिळून आला. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नितेश नवनाथ राणे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १२२ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













