RBI Plastic Currency Notes: भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा? १० आणि २० रुपयांच्या नोटांवर RBI ची ‘फील्ड ट्रायल’ सुरू

RBI Plastic Currency Notes: भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा? १० आणि २० रुपयांच्या नोटांवर RBI ची 'फील्ड ट्रायल' सुरू

UFlex आणि अमेरिकेच्या Spectra सिस्टीम्सची संयुक्त बोली; कागदी नोटांपेक्षा पॉलिमर नोटा अधिक टिकाऊ असणार

*नवी दिल्ली :* भारतात लवकरच १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिकच्या (पॉलिमर) नोटा चलनात दिसण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) या नोटांची प्रत्यक्ष बाजारात ‘फील्ड ट्रायल’ (Field Trial) करण्याची तयारी सुरू केली आहे. प्लास्टिक नोटांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या विशेष सामग्रीच्या पुरवठ्याकरिता आरबीआयने इच्छुक कंपन्यांकडून अधिकृत प्रस्ताव मागवले आहेत.

*UFlex आणि Spectra सिस्टीम्सकडून बोली दाखल*
आरबीआयची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी ‘भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड’ (BRBNMPL) कडून या प्रकल्पाची प्रक्रिया राबवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील आघाडीची पॉलिमर कंपनी ‘UFlex’ आणि अमेरिकेची ‘Spectra Systems’ यांनी संयुक्तपणे या प्रकल्पासाठी आपली बोली (Bid) सादर केली आहे. या भागीदारीअंतर्गत UFlex ची पॉलिमर निर्मितीची क्षमता आणि Spectra सिस्टीम्सचे बँकनोटांच्या सुरक्षेचे प्रगत तंत्रज्ञान यांचा वापर केला जाणार आहे.

*काय आहे आरबीआयचा ‘पॉलिमर’ प्रकल्प?*
कागदी नोटांच्या तुलनेत प्लास्टिक किंवा पॉलिमरच्या नोटा अत्यंत टिकाऊ असतात आणि लवकर खराब होत नाहीत. या नोटांच्या छपाईसाठी ‘BOPP’ (Biaxially Oriented Polypropylene) या विशेष पॉलीप्रोपाइलीन साहित्याची आवश्यकता असते, ज्यामुळे छपाई आणि सुरक्षा शाई योग्य प्रकारे टिकून राहण्यास मदत होते. आरबीआयच्या प्रस्तावित मागणीनुसार १० आणि २० रुपयांच्या नोटांच्या चाचणीसाठी प्रत्येकी ३४,००० रीम असे एकूण ६८,००० रीम साहित्य खरेदी केले जाणार आहे.

Ronic

*२०१२ मधील पायलट प्रोजेक्टनंतर पुन्हा चाचणी*
यापूर्वी केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१२ मध्ये देशातील ५ प्रमुख शहरांमध्ये (कोची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला) १० रुपयांच्या प्लास्टिक नोटांचा पायलट प्रोजेक्ट राबवला होता. मात्र, त्या वेळी एटीएम मशीन्स आणि तांत्रिक यंत्रणेत अडचणी आल्यामुळे हा प्रयोग स्थगित करण्यात आला होता. आता नव्या तंत्रज्ञानासह आरबीआय पुन्हा एकदा प्रायोगिक तत्त्वावर १० आणि २० रुपयांच्या नोटा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.