Chiplun Gravity Water Scheme: ग्रॅव्हिटी पाणी योजनेतील त्रुटी दूर करण्याचा निर्णय; चिपळूण नगर परिषदेच्या विशेष सभेत घोषणा

Chiplun Ganeshotsav Registration: गणेशोत्सवाला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी चिपळूण पालिकेकडून आवाहन

घरपट्टीच्या ३,५८४ तक्रारींपैकी ४६५ मालमत्तांचा कर घटला; मे २०२७ अखेर पाणी योजना पूर्ण करण्याची ग्वाही

Chiplun Gravity Water Scheme: चिपळूण शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेतील तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करून कामाला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय चिपळूण नगर परिषदेच्या विशेष सभेत सोमवारी घेण्यात आला. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या विशेष सभेत ग्रॅव्हिटी पाणी योजना, घरपट्टी आकारणीतील तक्रारी तसेच आगामी दिवाळीनिमित्त फटाके-कंदील विक्री आणि महिला बचत गटांना स्टॉलसाठी जागा देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

Chiplun Gravity Water Scheme: जुना ठेका रद्द, मे २०२७ अखेर काम पूर्ण करण्याची ग्वाही

ग्रॅव्हिटी पाणी योजनेच्या कामाचा आढावा घेताना जुन्या पीएमसीचा ठेका रद्द केल्याची माहिती नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिली. संबंधित ठेकेदाराकडून कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या ठेकेदाराकडून सुमारे ४० टक्के काम पूर्ण झाले असून, नवीन ठेकेदाराने ही योजना मे २०२७ अखेर पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. या योजनेसाठी आवश्यक परवानग्या, तांत्रिक नियोजन आणि अडथळे दूर करण्याची तयारी करण्यात आली आहे. धरणातील पाणी टॅपिंगसाठी नगर परिषदेला ७५ टक्के तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. मजिप्राने आपला हिस्सा लवकर भरावा यासाठी पाठपुरावा करण्याचे सभेत ठरले.

नळांना थेट पंप जोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तयारी

सभेत पेठमाप परिसरातील नगरसेवक बुरटे यांनी नगर परिषदेच्या नळाला पाणी येत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. काही नागरिकांनी थेट पाणीपुरवठ्याच्या नळांना पंप जोडल्यामुळे इतरांच्या पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याची दखल घेत पाणीपुरवठा विभागाचे अभियंता भुरण यांना नळांना थेट पंप जोडणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा करून यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. ही यादी पुढील सभेत सादर करून संबंधितांवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव मांडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

५,७०० मालमत्तांची नोंदच नाही; घरपट्टीच्या ३,५८४ तक्रारींचे निवारण

नगर परिषद हद्दीतील सुमारे ५,७०० मालमत्तांची गेल्या काही वर्षांत नोंदच झाली नसल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले असून, यामुळे गेल्या पाच वर्षांत नगर परिषदेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती प्रशासनाने दिली. तसेच घरपट्टी कराच्या आकारणीबाबत प्राप्त झालेल्या ३,५८४ अर्जांपैकी २४६९ अर्जदारांची सुनावणी झाली, तर १११५ अर्जदार गैरहजर राहिले. १४९८ मालमत्तांची फेरतपासणी करण्यात आली; ज्यामध्ये ९३१ मालमत्तांच्या करात बदल झाला नाही, ४६५ मालमत्तांचा कर कमी झाला, तर १०२ मालमत्तांच्या करात वाढ झाल्याचे नोंदवण्यात आले. तक्रारदार मालमत्ताधारकांकडून पुन्हा अर्ज घेऊन त्यांच्या समस्यांचे निरसन करण्याचे सभेत निश्चित करण्यात आले.

Tata nexon

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 06-10-2026