मुख्याधिकारी अभिजित कुंभार आणि व्यापाऱ्यांची बैठक; मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे व झड्यांच्या उंचीची संयुक्त पाहणी होणार
Rajapur Encroachment Drive संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगरपालिकेच्या प्रशासनाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली असून, राजापूर शहरातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावरील अतिक्रमणे, दुकानांसमोरील पायऱ्या आणि पावसाळ्यासाठी उभारलेल्या झड्या व्यापाऱ्यांनी स्वतःहून काढून घ्याव्यात, असे आवाहन केले आहे. ही अतिक्रमणे स्वतःहून हटवली गेली नाहीत, तर नगरपालिकेकडून धडक मोहीम राबवून ती काढून टाकली जातील आणि या कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा राजापूरचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी दिला आहे. २१ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली.
दोन दिवसांपूर्वी नगरपालिकेने बाजारपेठ परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करण्यापूर्वी व्यापाऱ्यांशी चर्चा करावी, अशी विनंती व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी संघाचे पदाधिकारी आणि स्थानिक व्यापाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.
Rajapur Encroachment Drive: सर्वांवर समान कारवाई आणि व्यापारी संघाची भूमिका
बैठकीत बोलताना मुख्याधिकारी कुंभार यांनी सांगितले की, वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण कोणाचेही असले तरी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही आणि सर्वांवर समान कारवाई केली जाईल. यावर व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेला व्यापाऱ्यांचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले. व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे काढावीत, असे आवाहन करतानाच प्रशासनानेही व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच विस्कळित झालेल्या आठवडा बाजाराला शिस्त लावणे आणि झड्यांच्या उंचीबाबत स्पष्ट नियमावली ठरवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

वीजवाहिन्या, पार्किंग आणि संयुक्त पाहणीचा निर्णय
चर्चेदरम्यान दिनानाथ कोळवणकर यांनी बाजारपेठेतील धोकादायकरीत्या लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर महावितरणशी समन्वय साधून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. याशिवाय व्यापाऱ्यांनी स्वतःची दुचाकी वाहने दुकानांसमोर उभी न करता वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी पार्क करावीत, अशी सूचना प्रशांत पवार यांनी मांडली. आठवडा बाजारातील बेशिस्तपणा आणि इतर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेतली जाणार असल्याचे कुंभार यांनी स्पष्ट केले.
मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे आणि झड्यांची उंची तपासण्यासाठी पालिका प्रशासन आणि व्यापारी संघाचे प्रतिनिधी संयुक्तपणे प्रत्यक्ष पाहणी करणार असून, त्यानंतर संबंधितांना अतिक्रमण हटवण्याच्या अंतिम सूचना दिल्या जातील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीला अधिकारी आणि व्यापाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस पोलीस निरीक्षक अतिम यादव, पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, नगरसेवक सुलतान ठाकूर, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, राजेंद्र नवाळे, विवेक गादीकर आणि आजीम जैतापकर यांच्यासह शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













