Devhare Jal Sandharan Mandangad: देव्हारे येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम; जेसीबीने बांधला बंधारा

पशुधनासाठी आणि भूजलपातळी वाढवण्यासाठी सामाजिक बांधिलकी

Devhare Jal Sandharan Mandangad: मंडणगड तालुक्यातील देव्हारे येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा (उत्तर रत्नागिरी) यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. भाजप जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या पुढाकाराने स्थानिक ओढ्यावर जेसीबीच्या साहाय्याने तात्पुरता बंधारा उभारण्यात आला आहे.

Devhare Jal Sandharan Mandangad: भूजलपातळी वाढवणे अन् वन्यप्राण्यांना दिलासा

देव्हारे परिसरातील ओढ्याची पाण्याची पातळी वेगाने कमी होत असल्याची बाब लक्षात घेऊन, पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला. या बंधाऱ्यामुळे ओढ्यातील वाहता प्रवाह अडवला जाऊन पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे. यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांची (बोरवेल) भूजलपातळी टिकून राहण्यास मोठा फायदा होणार आहे.

विशेषतः उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर परिसरातील गुरेढोरे, पशुधन तसेच वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या जलसाठ्यामुळे प्राण्यांना उन्हाळ्यातही मुबलक पाणी उपलब्ध राहील, हा मुख्य उद्देश समोर ठेवून हे काम करण्यात आले.

‘सेवा संकल्प अभियान’ कृतीतून साकार: अभिजीत देवळेकर

यावेळी बोलताना भाजप जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी सांगितले की, “‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ सामाजिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता पर्यावरण रक्षण, जलसंधारण आणि पशुपक्ष्यांच्या हितासाठी प्रत्यक्ष कृतीतून योगदान देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. पाणी हीच मानवासह सर्व जीवसृष्टीची मूलभूत गरज असून, उपलब्ध पाण्याचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”

Shree clinic

देव्हारे येथे राबवण्यात आलेल्या या जलसंधारण उपक्रमाचे परिसरातील ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:14 06-10-2026