आंब्याचा माळ गवळीवाडी परिसरात सोमवारी सकाळी घडली घटना; बाधित शेतकऱ्याला भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन
देवरूख :
Purye Tarf Devle Leopard Attack Cow Killed अंतर्गत पुर्ये तर्फे देवळे परिसरातील धनगरवाडी येथील शेतकरी सखाराम आब्या कोळापटे यांची पाळीव गाय बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आंब्याचा माळ गवळीवाडी परिसरात ही घटना घडली असून यामुळे बाधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
चराईसाठी गेलेल्या गाईवर बिबट्याची झडप
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी सखाराम कोळापटे हे नेहमीप्रमाणे आपली गुरे चरण्यासाठी जंगलातील ‘आंब्याचा माळ’ परिसरात घेऊन गेले होते. त्यावेळेस अचानक बिबट्याने एका गाईवर झडप घातली. या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली आणि काही क्षणांतच तिने जागीच प्राण सोडले.
आमदार किरण सामंत यांच्या कार्यालयाची तातडीने दखल
या घटनेची माहिती मिळताच माजी उपसरपंच बापू लोटणकर यांनी स्थानिक आमदार किरण सामंत यांच्याशी संपर्क साधून घटनेबाबत कळवले. आमदार कार्यालयाने तातडीने याची दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्याचे निर्देश दिले.
वनविभागाकडून पंचनामा पूर्ण; आर्थिक भरपाईचे आश्वासन
आमदारांच्या सूचनेनंतर दामोळेच्या वनरक्षक सुप्रिया काळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. तसेच, बाधित शेतकरी सखाराम कोळापटे यांना वनविभागाच्या नियमांनुसार शासनाकडून लवकरात लवकर योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पंचनाम्याच्या वेळी माजी उपसरपंच बापू लोटणकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, वनरक्षक सुप्रिया काळे आणि रमेश बावदाने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 07-10-2026














