पीएम स्वनिधी योजनेतून कर्ज मिळवून दिलेल्या टपऱ्यांवरच दापोलीत कारवाई
दापोली :
Dapoli Street Vendors Protest अंतर्गत दापोली नगरपंचायतीकडून शहरातील टपऱ्या, खोके व छोट्या व्यावसायिकांवर सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे पथविक्रेते व स्वयंरोजगार करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “एकीकडे व्यवसाय उभा करण्यासाठी कर्ज मिळवून द्यायचे आणि दुसरीकडे त्याच व्यावसायिकांच्या टपऱ्यांवर कारवाई करायची,” अशा नगरपंचायतीच्या दुटप्पी भूमिकेबद्दल छोट्या व्यावसायिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Dapoli Street Vendors Protest: ‘कर्ज फेडायचे कसे?’; नगरपंचायतीच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्त्यांचा हल्लाबोल
बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. नगरपंचायतीच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत बँक ऑफ इंडियाच्या दापोली शाखामार्फत पीएम स्वनिधी (प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी) योजनेअंतर्गत रमेश अनंत तुरे यांना सुमारे ५० हजार रुपयांचे कर्ज नगरपंचायतीच्या शिफारशीने मिळवून देण्यात आले होते. तसेच दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत भाजीपाला विक्रीसाठी बँक अर्थसहाय्य मिळवून देण्यात नगरपंचायतीने मदत केली होती.
“जर नगरपंचायत आधी कर्ज मिळवून देते आणि नंतर कारवाई करून व्यवसाय बंद पाडत असेल, तर या गरिबांनी घेतलेले कर्ज फेडायचे कसे? प्रशासनाने याचा विचार केला आहे का?” असा थेट सवाल मंगेश मोरे यांनी उपस्थित केला. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी याप्रकरणी तात्काळ निर्णयात्मक भूमिका घेतली नाही, तर थेट त्यांच्या दालनात बसू, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
सत्ताधारी नगरसेवकांच्या भूमिकेवर नाराजी, तर भाजप नगरसेविकेचे कौतुक
कारवाई सुरू असताना सत्ताधारी पक्षातील नगरसेवक किंवा पदाधिकारी यांच्यापैकी कोणीही व्यावसायिकांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहिले नसल्याची खंत या वेळी व्यक्त करण्यात आली. मात्र, भाजपच्या नगरसेविका जया साळवी या कारवाईदरम्यान छोट्या व्यावसायिकांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष मैदानात उतरल्याने उपस्थितांनी त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 08-10-2026














