रत्नागिरीत क्रिकेट सामने खेळण्यासाठी आलेले खेळाडू पोहण्यासाठी डोहात उतरले; उडी मारताना दगडावर आदळल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
Kolambe Drowning Incident मध्ये रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथील पऱ्यामधील धोकादायक डोहात बुडून कल्याण-मुंबईतील दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.
सौरव पवनकुमार झा (वय १६) आणि शुभम रमेश यादव (वय १६, रा. कल्याण-मुंबई) अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. कोळंबे येथे गेल्या तीन दिवसांपासून १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी कल्याण येथील एका क्रिकेट अकॅडमीची २० खेळाडूंची टीम रत्नागिरीत आली होती. गुरुवारी दुपारी या टीमचा सामना संपल्यानंतर सौरभ आणि शुभम हे दोघे क्रिकेट मैदानाच्या बाजूलाच असलेल्या पऱ्यात पोहण्यासाठी गेले होते.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा डोह अत्यंत धोकादायक आणि जंगल भागात असल्याने प्रशासनाकडून तसेच स्थानिकांकडून येथे पोहण्यास बंदी असल्याचे १ नाही तर २ ते ३ सूचना फलक (बोर्ड) लावण्यात आले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून या दोन्ही मुलांना डोहात उतरण्याचा मोह आवरला नाही. आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत ते डोहाकडे गेले आणि त्यांनी पाण्यामध्ये उडी मारली; परंतु उडी मारल्यानंतर दोघेही पाण्याच्या वर आलेच नाहीत.
सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी हे पाहताच घाबरून आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. मात्र, मुलांना पाण्यातून बाहेर काढण्यास काही वेळ गेला. बाहेर काढल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्याचे दिसून आले. यावरून डोहात उडी मारल्यानंतर ते खालील दगडांवर जोरदार आदळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पूर्णगड पोलीस ठाण्याचे पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून घटनेची माहिती कल्याण येथील त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे क्रीडा वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 09-10-2026














