पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: रत्नागिरी जिल्ह्यातील ५९१ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध; ३१ मार्च २०२७ पर्यंत हिश्श्याची रक्कम भरण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: रत्नागिरी जिल्ह्यातील ५९१ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध; ३१ मार्च २०२७ पर्यंत हिश्श्याची रक्कम भरण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत एकवेळ समझोता प्रक्रियेला वेग; लाभ मिळवण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण अनिवार्य

रत्नागिरी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत ‘एकवेळ समझोता योजने’ची प्रमाणित कार्यपद्धती आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या विशिष्ट क्रमांकांची यादी २० नोव्हेंबर २०२६ रोजी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील ५९१ शेतकरी आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरले असून, संबंधित लाभार्थ्यांनी विहित मुदतीत स्वतःच्या हिश्श्याची रक्कम भरून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) राम कुलकर्णी यांनी केले आहे.

यादी कुठे पाहावी आणि यादीतील तपशील
प्रसिद्ध करण्यात आलेली पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालय, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा स्तर, तसेच सर्व राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीमध्ये शेतकऱ्याचे नाव, बँकेचा तपशील, विशिष्ट क्रमांक, ३१ मार्च २०२६ रोजीची थकीत कर्ज रक्कम (स्तंभ ९), हेअरकट सवलत वजा जाता थकीत रक्कम (स्तंभ १०), शेतकऱ्याने भरावयाचा हिस्सा (स्तंभ ११) आणि पात्र शासकीय लाभाची रक्कम (स्तंभ १२) यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुदत आणि अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणीची अट
ही एकवेळ समझोता योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत वैध राहणार आहे. हा पर्याय निवडणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या हिश्श्याची रक्कम ३१ मार्च २०२७ पर्यंत भरणे बंधनकारक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी (फार्मर आयडी) क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांची अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रावर’ जाऊन ही नोंदणी पूर्ण करून घ्यावी.

Shitit jyotish

स्वतःचा हिस्सा भरण्याची कार्यपद्धती
शेतकऱ्याचे एकच कर्ज खाते असल्यास स्तंभ ११ मधील स्वतःच्या हिश्श्याची रक्कम संबंधित बँक शाखेत भरणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, पात्र थकीत रक्कम २.६० लाख रुपये असल्यास, शेतकऱ्याला प्रथम स्वतःचा हिस्सा म्हणून ६०,००० रुपये भरावे लागतील आणि त्यानंतर नियमानुसार उर्वरित पात्र रकमेवर पुढील कार्यवाही होईल. ज्या शेतकऱ्यांची एकापेक्षा जास्त कर्ज खाती आहेत, ते आपला हिस्सा कोणत्याही एका कर्ज खात्यात भरू शकतात; मात्र एका खात्यात भरावयाची कमाल रक्कम स्तंभ १० मधील रकमेपेक्षा जास्त नसावी. या संदर्भात संबंधित बँकांकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले जाईल.

आधार प्रमाणीकरण आणि लाभाची प्रक्रिया
बँकांनी शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या रकमेची माहिती दर शुक्रवारी महाआयटी पोर्टलवर अद्ययावत करणे आणि त्याची माहिती संबंधित शेतकऱ्याला देणे आवश्यक आहे. पोर्टलवर रक्कम भरल्याची नोंद झाल्यानंतर ३ दिवसांनी आधार प्रमाणीकरणाची सुविधा सुरू होईल. त्यानंतर शेतकऱ्यांनी नियुक्त ‘आपले सरकार सेवा केंद्रावर’ जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे.

"आधार प्रमाणीकरण, तक्रार नोंदणी आणि तक्रार निवारणाची प्रक्रिया नियमित कर्जमाफी योजनेप्रमाणेच राहील. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर शासकीय लाभाची रक्कम शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात वर्ग केली जाईल आणि शासकीय हिस्सा प्राप्त झाल्यानंतर बँक संबंधित कर्ज खात्याचे लेजर (खातेपुस्तिका) अद्ययावत करेल."