फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेले वृद्ध बेपत्ता; मुलाच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा नोंदवून पोलिसांकडून शोध सुरू
Ratnagiri Kidnapping News अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी-बौद्धवाडी येथून एका ६५ वर्षीय वृद्धाचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ लक्ष्मण पवार (वय ६५, रा. चाफेरी बौद्धवाडी, रत्नागिरी) असे अपहरण झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मंगळवारी (ता. ६) सकाळी १० ते ११:३० वाजेच्या सुमारास चाफेरी बौद्धवाडी परिसरात ही घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंत सिद्धार्थ पवार (वय ३४, रा. चाफेरी बौद्धवाडी, सध्या रा. रूम नं. ५, चाळ नं. १, गणेश नगर, डोंबिवली पश्चिम) यांचे वडील सिद्धार्थ पवार हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे परिसरात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. शोध घेऊनही त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने अखेर मुलगा हेमंत पवार यांनी जयगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली.
मुलाने दिलेल्या खबरीवरून जयगड पोलिसांनी वृद्धाचे अपहरण झाल्याप्रकरणी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सकाळी फेरफटका मारताना अचानक वृद्ध गायब झाल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार करत असून, वृद्धाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 09-10-2026














