Gogate Joglekar College: गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात हिंदी पंधरवडा उत्साहात

भित्तिपत्रकाचे अनावरण आणि विविध स्पर्धांचे आयोजन; ‘हिंदी रोजगार आणि नवाचार’ विषयावर दिल्ली विद्यापीठातील डॉ. अनिल कांबळे यांचे ऑनलाईन व्याख्यान

Gogate Joglekar College येथील हिंदी विभाग आणि वाङ्मय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हिंदी पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेत लिहिलेल्या विविध लेखांच्या भित्तिपत्रकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

अनावरण प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेविषयी आस्था बाळगून हिंदी साहित्याचे अवांतर वाचन केले पाहिजे आणि समाजात या भाषेचा प्रचार-प्रसार केला पाहिजे. तसेच हिंदी विभागातील पीएच.डी. संशोधन केंद्रातून विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त करावी, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमादरम्यान हिंदी निबंध, काव्यवाचन व पोस्टर सादरीकरण स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमास कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. शिवराज गोपाळे आणि हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे उपस्थित होते. हिंदी निबंध स्पर्धेत सानिया शेख (प्रथम), वैष्णवी पेडणेकर (द्वितीय) व आयुश पवार (तृतीय) यांनी यश मिळवले. काव्यवाचन स्पर्धेत अंजली चौहान, दीप्ती झगडे व सेजल मेस्त्री यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. तर पोस्टर सादरीकरणात प्रथम वर्षातून सबिहान्ज खान व ग्रुप आणि तृतीय वर्षातून सानिका पवार यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

या पंधरवड्यानिमित्त ‘हिंदी रोजगार और नवाचार’ या विषयावर डॉ. भीमराव आंबेडकर महाविद्यालय (दिल्ली विश्वविद्यालय) येथील डॉ. अनिल कांबळे यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जागतिकीकरणाच्या काळात हिंदी भाषेने आपल्या सीमा ओलांडल्या असून विदेशातील विद्यापीठांमध्येही तिचे अध्ययन-अध्यापन सुरू आहे, असे सांगत त्यांनी हिंदी भाषेतील रोजगाराच्या विविध संधींवर प्रकाश टाकला.

Arihant 4

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 09-10-2026