सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू; शिंदे गटाच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल
Shiv Sena Case Supreme Court मधील गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाटपाबाबतचा वाद आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणातील सर्व युक्तिवाद संपण्याची शक्यता असून, त्यानंतर काही दिवसांतच सर्वोच्च न्यायालय यावर ऐतिहासिक निकाल देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल एसआयआर (SIR) प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ही महत्त्वाची तोंडी टिप्पणी केली आहे. त्यामुळे ३० ऑक्टोबरनंतर ठाकरे गट की शिंदे गट, शिवसेना कोणाची? याबाबतचा अंतिम फैसला होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील नीरज कौल यांनी पक्षचिन्हाबाबतचा युक्तिवाद पूर्ण केला असून, आता १३ ऑक्टोबर रोजी ते आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आपली बाजू मांडणार आहेत. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी नीरज कौल यांना वारंवार एकच थेट प्रश्न विचारला, “निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाला चिन्ह देण्याऐवजी दुसरा पर्याय नव्हता का? निवडणूक आयोग दुसऱ्या पर्यायांचा विचार करू शकत नव्हता का?” न्यायालयाच्या या प्रश्नामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नीरज कौल यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या बाजूनेही न्यायालयात युक्तिवाद सादर केला जाईल. हे सर्व युक्तिवाद ३० ऑक्टोबरपूर्वीच पूर्ण केले जाणार आहेत. या खटल्याचा निकाल केवळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय भविष्य ठरवणारा नसून, देशभरातील राजकीय पक्षांसाठी एक अत्यंत मार्गदर्शक आणि ऐतिहासिक निकाल ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 09-10-2026














