भूजल पातळीत ५.२२ मीटरने घट
Ratnagiri Water Shortage म्हणजेच पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने पावसाळ्यातच तीव्र पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. पावसाळा संपताच नदी, नाले, ओढे-व्हाळ आणि विहिरींच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाल्यामुळे जिल्ह्यातील १८३ गावांवर पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे ग्रामीण भागासह रत्नागिरी शहरातही नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भूजल सर्वेक्षणाच्या निरीक्षणानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात भूजल पातळीत सरासरी ५.२२ मीटरने मोठी घट नोंदवण्यात आली आहे. विशेषतः राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यांमध्ये ही घट अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे जमिनीत पुरेसे पाणी मुरू शकले नाही. परिणामी विहिरी, कूपनलिका आणि अन्य भूजल स्रोतांवरील ताण कमालीचा वाढला असून आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे.
रत्नागिरी शहरात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन नगरपालिकेने दर सोमवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेतही कपात लागू करण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर लगेचच अशा प्रकारचे निर्बंध घालावे लागत असल्याने शहरातील जलस्रोतांवरील ताण स्पष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील दापोली तालुक्यातही पावसाने लवकर निरोप घेतल्याने नद्या, ओढे आणि विहिरींमधील पाणीपातळी झपाट्याने घटत असून जलस्रोत आटण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आतापासूनच योग्य नियोजनाची गरज निर्माण झाली आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी लहान बंधारे उभारणे, विहिरींचे पुनर्भरण करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
राजापूर तालुक्यातही कमी पावसामुळे ओढे-व्हाळांची पात्रे कोरडी पडू लागली असून, काही ठिकाणी गणेश विसर्जनासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून आले होते. या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून वनराई बंधारे उभारण्यावर विशेष भर दिला जात आहे. आगामी उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच पाणी नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.













