भाजप नेत्यांच्या आक्रमक हल्ल्यानंतर रामदास कदम पक्षात एकटे पडले..? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ramdas Kadam and Mahayuti Politics: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला असून महायुतीमधील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते, तसेच आमदार प्रसाद लाड यांना लक्ष्य केले होते. या घडामोडीनंतर भाजप नेत्यांनीही अत्यंत आक्रमक पवित्रा घेत कदमांवर जोरदार पलटवार केला. वाढत्या राजकीय संघर्षाची गांभीर्याने दखल घेत, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना या विषयावर आणखी कोणतेही भाष्य न करण्याची स्पष्ट सूचना दिल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदेंची मध्यस्थी आणि वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मंत्री उदय सामंत यांनी सुरुवातीला समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, परंतु वाद थांबण्याचे नाव घेत नव्हता. अशातच, महायुतीमधील मतभेद अधिक वाढू नयेत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सूत्रे हाकत रामदास कदम यांना या वादावर आता इथेच थांबण्याचे आणि पुढील भाष्य न करण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून राज्यातील महायुती सरकारमधील अंतर्गत वाद मिटवून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शिंद्यांकडून केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
रामदास कदम पक्षात पडले का एकाकी?
या संपूर्ण वादात रामदास कदम यांनी थेट भाजपला लक्ष्य केले होते आणि पंतप्रधानांना पत्र लिहून मित्रपक्षाकडून होत असलेल्या त्रासाबाबत नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, या सगळ्या वादानंतर शिवसेनेतील इतर नेत्यांची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी रामदास कदमांवर कडक शब्दांत टीका केली, परंतु मंत्री उदय सामंत यांचा अपवाद वगळता शिवसेनेच्या इतर कोणत्याही मोठ्या नेत्याने भाजप नेत्यांच्या टीकेला जाहीरपणे प्रत्युत्तर दिलेले नाही.

शिवसेना नेत्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण कदमांच्या बचावाला कोणीही उभे राहिलेले नाही. त्यामुळे भाजपशी थेट सामना करणाऱ्या रामदास कदम हे पक्षात एकाकी पडल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. महायुतीमधील हा अंतर्गत कलह आगामी काळात कितपत शांत होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.













