५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापले; रामदास कदमांच्या चौकशीची मागणी करत जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप
Manoj Jarange Patil on Audio Clip Controversy: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ५०० कोटींच्या देवाण-घेवाणीची कथित ऑडिओ क्लिप सार्वजनिक केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला असून, याद्वारे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आमनेसामने आले आहेत. या संपूर्ण प्रकरणावरून आता खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर दावा केला आहे. हे खूप मोठे नेटवर्क असून आपल्या घरावर हल्ला केला जाऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
रामदास कदमांकडे सगळं आहे, त्यांची चौकशी व्हावी
पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "मी दिलेली ऑडिओ क्लिप माझ्याआधीच व्हायरल झाली होती, ती खुद्द रामदास कदम यांनीच व्हायरल केली आहे. त्यामुळे रामदास कदम यांची कसून चौकशी झाली पाहिजे, कारण त्यांच्याजवळच या सगळ्या गोष्टींची माहिती आहे." तसेच, आपण जी क्लिप दिली आहे, त्या माहितीच्या स्रोताची (Source) संपूर्ण हमी आणि जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, असे सांगत या प्रकरणापुरता आपल्याला त्यांच्यावर विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
"माझ्यावर हल्ल्याचे षडयंत्र रचले जात आहे"
मुख्यमंत्र्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बाजूची काही लोक आपल्यावर हल्ल्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावाही जरांगे यांनी केला. "माझ्या घरावर हल्ला होऊ शकतो आणि मला मारून टाकण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सरकारने माझी सुरक्षा (स्कोटिंग) काढून घेतली असून, दसरा मेळाव्यालाही शेवटपर्यंत पोलिसांची सुरक्षा दिली नाही," असा आरोप त्यांनी केला. ही ऑडिओ क्लिप ‘एआय’ (AI) जनरेटेड असल्याचा दावा करणाऱ्यांना फटकारत, ही क्लिप पूर्णपणे ओरिजिनल असल्याची खात्री सर्वांनाच असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, नवनाथ बन यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना, "१०० का कोटी होईना, पैसे होते का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

श्रीकांत शिंदे आणि प्रसाद लाड यांचे आरोप-प्रत्यारोप
५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपसंदर्भातील दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच उत्तर दिले आहे, आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर बोलायचे की नाही हा त्यांचा अधिकार आहे, असे जरांगे म्हणाले. मात्र, श्रीकांत शिंदे यांची या प्रकरणात कोणतीही चूक नाही, मग ते गप्प कसे बसणार? असा सवालही त्यांनी केला.
दुसरीकडे, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या सर्व प्रकरणामागे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जाणीवपूर्वक भांडण लावण्यासाठी संजय राऊत यांनी ‘सामना’च्या स्टुडिओत ही बनावट क्लिप तयार करून घेतल्याचा दावा लाड यांनी केला असून, पोलिसांनी राऊतांना तातडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले पाहिजे, अशी मागणी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.













